Pune: वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग; अल्पवयीन मुलाने एकाला दगडाने ठेचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:52 IST2024-12-04T19:51:50+5:302024-12-04T19:52:01+5:30
आरोपीला तुझा बाप टकल्या म्हंटल्यावर त्याने भला मोठा दगड उचलून आधी पाठीत आणि नंतर छातीत मारला

Pune: वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग; अल्पवयीन मुलाने एकाला दगडाने ठेचले
किरण शिंदे
पुणे: पुण्यात किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केलाय. वाघोली परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय. मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने या अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केले. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि मयत दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहे. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरात ते राहतात. दरम्यान आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघेही मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी त्यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. आणि मयत राजू लोहार यांनी आरोपीला उद्देशून तुझा बाप टकल्या आहे असे म्हंटले. याचाच राग आल्याने आरोपी अल्पवयीन तरुणाने राजू लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारीच पडलेला भला मोठा दगड उचलून आधी त्याच्या पाठीत आणि नंतर छातीत मारला. दगडाचा घाव वर्मी लागल्याने राजू लोहार याचा मृत्यू झाला.
दरम्यान खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजू लोहार यांच्या मुलाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
मागील दोन दिवसात पुणे शहरात खुनाचे चार प्रकार उघडकीस आले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून चार जणांनी १८ वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री तीन अल्पवयीन तरुणांनी पूर्व वैमन्याशातून एका तरुणाचा खून केला. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतही असाच प्रकार घडलाय. अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार करत अल्पवयीन तरुणाला संपवलं. तर चौथा खुनाचा प्रकार हा वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला.