आई-वडिलांना पैसे न देणाऱ्या मुलावर गुन्हा; ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार रक्कम देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:36 AM2023-03-16T10:36:56+5:302023-03-16T10:40:02+5:30
पोलिसांनी फिर्यादीचा ४२ वर्षीय मुलगा याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला नोटीस दिली ...
पिंपरी : आई-वडिलांना न संभाळणाऱ्या मुलाला ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार हवेली उपविभागीय अधिकारी यांनी दरमहा ठरावीक रक्कम देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, मुलाने आई-वडिलांना ठरलेला निर्वाहभत्ता दिला नाही. तसेच वडिलांचा मानसिक छळ केला. ही घटना ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी ६३ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचा ४२ वर्षीय मुलगा याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला नोटीस दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुले त्यांचा व त्यांच्या पतीचा सांभाळ करीत नाहीत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक मुलाला दरमहा पाच हजार रुपये आपल्या आई-वडिलांना निर्वाह भत्ता म्हणून देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, फिर्यादी सर्वांत मोठा ४२ वर्षीय मुलगा निर्वाह भत्ता त्यांना न देता शिवीगाळ करीत होता. तसेच त्यांच्या घरात भिंतीवर काहीही लिहून भिंतीचे विद्रूपीकरण करत फिर्यादीच्या पतीचा मानसिक छळ करीत होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे.