जेवणाच्या थाळीवरील ऑफर पडली दीड लाखाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:29+5:302021-08-17T04:15:29+5:30
पुणे : शहरातील नामांकित थाळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डायनिंग हॉलच्या थाळीवर ऑफर असल्याचे सांगून लिंक पाठवून सायबर चोरट्याने ...
पुणे : शहरातील नामांकित थाळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डायनिंग हॉलच्या थाळीवर ऑफर असल्याचे सांगून लिंक पाठवून सायबर चोरट्याने तब्बल १ लाख ४४ हजार ४९७ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी मगरपट्टा येथील एका ३८ वर्षांच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला यांना ६ मार्च रोजी घरपोच थाळी मागवायची होती. त्यांनी प्रसिद्ध हॉटेलच्या थाळीचा गुुगलवरील नंबर पाहून संपर्क साधला. तेव्हा त्यांना थाळी बुक करण्यासाठी लिंक पाठवून ती भरून पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी लिंक ओपन करून भरून पाठविली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ४४ हजार ४९७ रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. त्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन पुढील तपासासाठी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक अडागळे अधिक तपास करीत आहेत.