Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:58 PM2024-03-13T12:58:09+5:302024-03-13T12:58:21+5:30
सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत यांचेही फोन येऊन गेले आहेत, कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगणार
पुणे: माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. कार्यालयातील राज यांच्या प्रतिमेला त्यांनी सांष्टांग नमस्कार घातला. दरवेळीप्रमाणे समाजमाध्यमांवर राजीनामा पत्र पोस्ट करून वेगळ्याच खास स्टाईलने मनसेला सोडचिठ्ठी दिली. यावेळी त्यांनी कुठल्ययी पक्षात जाण्याची भूमिका जाहीर केली नव्हती. दोन दिवसात माझी भूमिका जाहीर करणार असल्याचे मोरेंनी सांगितले होते. काल माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी मोरेंना अजित पवारांच्या गट येण्याची विनंती केली होती. आज थेट पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा याबाबत जोशींनी माझी भेट घेतली आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. मला मनसे मधील अनेक नेत्यांचे फोन आले. मी परतीचे दोर कापलेले आहेत. मला सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचे फोन आले. संजय राऊत म्हणाले तुम्ही सक्षम आहेत आणि योग्य निर्णय घ्या असे सांगितले. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मित्र म्हणून काल फोन केले आहेत. २००० फॉलोवर सोशल मीडियावर वर वाढले आहेत. मी कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मोरे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. पण मोरेंना हडपसरची विधानसभा द्यायची तर तिथे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व अन्य अनेक इच्छुकांनी आधीच रांग लावली आहे. दुसऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी पराभूत झालेले सचिन दोडके पक्षफुटीत शरद पवार यांच्याबरोबर राहिले ते खडकवासला भाजपचा मतदारसंघ आहे म्हणून. मोरेंना तिथून लढवायचे तर दोडके यांची अडचण होणार. त्यामुळेच तात्या आता नक्की करणार तरी काय, कि पुन्हा महापालिकेतच दिसणार असा प्रश्न मनसैनिकांच्या मनात आहे. तर आज काँगेसची ऑफर त्यांना आली आहे. त्यामुळे मोरे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.