धर्मादाय आयुक्त कार्यालय ‘हायटेक’
By Admin | Published: May 22, 2017 05:00 AM2017-05-22T05:00:00+5:302017-05-22T05:00:00+5:30
धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांची माहिती एका ‘क्लिक’वर उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त कार्यालयातर्फे सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांची माहिती एका ‘क्लिक’वर उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त कार्यालयातर्फे सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. परिणामी न्यास नोंदणी, बदल अर्ज, लेखापरीक्षण अहवाल आदी विषयांची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरणे शक्य झाले आहे. आता या प्रक्रियेचा वापर
कसा करावा, याबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाची माहिती पुणे विभागीय सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, श्यामकांत देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ मनोज वाडेकर आदी उपस्थित
होते.
पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण १ लाख ३३ हजार ७५८ संस्था येतात. त्यांतील बहुतांश संस्थांच्या कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले झाले असून, काही संस्थांची माहिती लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे नमूद करून कचरे म्हणाले, ‘‘पुढील काळात धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे सर्व कामे आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत. त्यामुळे नवीन संस्थेची नोंदणी केल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. तसेच बदल अर्ज, हिशेब पत्रके सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत.
रुग्णालयांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यामुळे कोणत्या रुग्णालयात गरीब नागरिकांसाठी किती बेड रिक्त आहेत, हे समजू शकणार आहे.’’