मार्चएंडला कार्यालये ‘आॅफ’लाइन

By admin | Published: March 30, 2016 02:13 AM2016-03-30T02:13:32+5:302016-03-30T02:13:32+5:30

अधिकाधिक मिळकतकराचा भरणा व्हावा, यासाठी महापालिकेने अभय योजना राबविली. करसंकलन कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यासह अधिकचे काउंटरही उपलब्ध करून दिले

Office of the marchend 'if' online | मार्चएंडला कार्यालये ‘आॅफ’लाइन

मार्चएंडला कार्यालये ‘आॅफ’लाइन

Next

पिंपरी : अधिकाधिक मिळकतकराचा भरणा व्हावा, यासाठी महापालिकेने अभय योजना राबविली. करसंकलन कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यासह अधिकचे काउंटरही उपलब्ध करून दिले आहेत. वेळेत कर भरण्याबाबत आवाहनही केले जात आहे. मात्र, तरीही कर भरण्यास काही मिळकतधारक उत्सुक नसल्याचे दिसून आले. ३१ मार्च अखेरची मुदत असतानाही काही करसंकलन कार्यालयांमध्ये मंगळवारी शुकशुकाट दिसत होता. तर काही कार्यालयांमध्ये वेळेत कर भरणा करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसत होती.

वेळ : ११.५०, डॉ. हेडगेवार भवन, निगडी
या कार्यालयांतर्गत असलेल्या बहुतेक मिळकतधारकांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीला भरणा केला असल्याने येथे कर भरणा करण्यासाठी फारशी गर्दी दिसली नाही. काही जणांची थकबाकी राहिली असून, त्यांच्या वसुलीसाठी आवाहन करण्यासह नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास दोन दिवस उरले असतानाही थकबाकीदारांनी कर भरलेला नाही.
१२.२५ : करसंकलन विभागीय कार्यालय, आकुर्डी
येथील कार्यालयात कर भरण्यासाठी एक-दोन ग्राहक येत होते. एका ग्राहकाची ६७ हजार ३०० रुपये कराची रक्कम होती. कार्यालयात चौकशी केली असता ३१ मार्च अखेरपर्यंत रक्कम भरल्यास सवलतीनुसार ६० हजार रुपये भरावे लागतील. मात्र, त्यानंतर संपूर्ण रक्कम भरावी लागेल, असे ग्राहकाला सांगण्यात आले. त्यावर सुमारे सात हजार रुपये वाचतील, या हिशेबाने संबंधित ग्राहकाने लगेचच ६० हजारांची रक्कम जमा केली. आपली किती रक्कम आहे आणि सवलतीची रक्कम किती होईल, याबाबतची माहिती घेण्यासाठी मिळकतधारक येत होते.
१.१० : करसंकलन विभागीय कार्यालय, चिंचवड
कर भरण्यासाठी दोन काउंटरची व्यवस्था करण्यात आली होती. महिला व पुरुषांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती. कराची रक्कम भरायची आहे. मात्र, ती अधिक असल्याने एकरकमी भरणे शक्य नसल्याने काही रक्कम आता भरून उर्वरित रक्कम नंतर जमा करण्याच्या दृष्टीने एक जण आला होता. दरम्यान, कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने अभय योजनेची सविस्तर माहिती त्या मिळकतधारकाला दिली. एकरकमी कर भरल्यास अभय योजनेचा लाभ घेतला येईल, याबाबत सांगण्यात आले.
११.२५ : ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी
पाणी बिल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बिल भरायचे आहे. मात्र, तांत्रिक दोषामुळे आलेली वाढीव रकमेची बिले दुरुस्त करताना ग्राहक गोंधळून जात होते. बिले भरण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

बँकांचा वसुलीवर भर
हिशोबांची जुळवाजुळव करण्यासाठी मार्चअखेर बँकांमध्ये नागरिकांची धावपळ सुरू आहे. बँकांना वसुलीचे लक्ष्य दिले आहे. बँकांचे जास्तीत जास्त व्यवहार आॅनलाइन सुरू असतात. त्यामुळे बँकांमध्ये जास्त गर्दी होताना दिसून येत नाही. कोअर बँकींगमुळे ठेवी, थकबाकी, तसेच नफा व व्याज सर्व गोष्टी एकत्रित होत असल्याने पूर्वीप्रमाणे बँकांना त्रास जाणवत नाही. मात्र, व्यवस्थापक, वसुली अधिकारी यांच्यावर वसुलीची मोठी जबाबदारी आहे. बँकांमध्ये मार्चअखेर दररोज हिशोब जुळविण्याची कामे सुरू आहेत. गुरुवार ते रविवार अशा सलग आलेल्या चार दिवसांच्या सुटीमुळे बँकांना दुसऱ्या दिवशी कामकाज करण्यास मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच बँकांना मार्चअखेरच सर्व नफा, तोटा, तसेच व्याज, वसुली यांचा ताळेबंद बांधावा लागत आहे. एप्रिल नवीन आर्थिक वर्ष सुरू होते.

पाहुण्यांच्या घरांचा आसरा
वसुली पथकाचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेक जणांनी पाहुण्यांच्या गावांचा आसरा घेतला आहे. तर काही जणांनी मोबाइल स्वीच आॅफ केले आहेत. त्यामुळे पत नसताना कर्ज देणाऱ्या पतसंस्था चालकांची धावपळ उडाली आहे. अनेक पतसंस्थांनी केवळ संचालकांच्या शिफारशीवरून अनेक जणांना कर्जाचे वाटप केले आहे. आर्थिक वर्षाअखेर आल्याने वसुली अधिकाऱ्यांचा कर्जदारांच्या मागे ससेमिरा लागला आहे. त्यामुळे अनेक जणांनी शहर सोडून पाहुण्यांच्या गावांचा आधार घेतला आहे. तर अनेक जणांनी मोबाइल स्वीच आॅफ करून काही काळापुरती सुटका करून घेतली आहे. खासगी बँकांच्या वसुली पथकाच्या गाड्या बोर्ड लावून फिरत आहेत. ती गाडी घराकडे येईल, या भीतीने काही थकबाकीदारांनी घरे कुलूपबंद केली आहेत. ते पाहून वसुली पथक माघारी फिरत आहे.

आरटीओ कार्यालयात मार्चअखेरची लगबग
पिंपरी : चिखलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मार्चअखेरमुळे लगबग सुरू आहे. सर्व कर्मचारी, अधिकारी आरटीओ कार्यालयात कामकाजात व्यस्त असलेले दिसून आले. रोख रक्कम भरण्याच्या विभागात कर भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मार्चअखेरच्या कामाचा ताण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. २४ मार्च ते २७ मार्च या लागोपाठ सुट्यांमुळे आरटीओ कार्यालयात नेहमीपेक्षा जास्त गजबज दिसत होती. मार्चअखेरच्या कामांसाठी सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचारी व्यस्त आहेत. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ हे चालू आर्थिक वर्ष संपणार असल्याने खासगी कंपन्या, बँकेत जमा-खर्च ताळेबंदचे कामकाज सुरू आहे. आरटीओ कार्यालयातही कर भरणे, नवीन वाहन खरेदीची नोंदणी करणे यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चालू आर्थिक वर्षातील महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी करताना दिसत होता. तडजोड शुल्क, दंडवसुली याकडेही लक्ष देण्यात आले आहे. परीक्षेचा कालावधी असल्याने दररोजच्या तुलनेत शिकाऊ परवाना काढण्यासाठी असणारी रांग कमी होती. मार्चअखेरची तयारी फेब्रुवारी महिन्यापासूनच केली जाते. महसूलचे वर्षभरातले उद्दिष्ट किती कमी आहे, ते पाहून त्यानुसार नियोजन केले जाते. मार्चअखेर असल्याने शहरातील ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून वाहनांचे कर भरण्याचे काम सुरू आहे.

संकेतस्थळावर
आला ताण
पिंपरी : विविध कर आणि बिले भरण्यासाठी शहरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सध्या नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. आयकर विभागातर्फे विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्याची सोय आॅनलाइन आहे. आकुर्डीतील आयकर विभागाच्या कार्यालयात शुकशुकाट होता. तासन्तास रांगेत उभे राहण्यासह वेळ व श्रम टाळण्यासाठी बहुतांश उद्योजक व व्यावसायिकांनी कार्यालयात न येता विवरणपत्र आॅनलाइन भरण्यालाच प्राधान्य दिले आहे. दरम्यान, अनेकांनी आॅनलाइन विवरणपत्र भरण्याला प्राधान्य दिल्याने आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ताण आल्याने आॅनलाइन प्रक्रिया काही प्रमाणात धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे काही जणांनी कार्यालयात येऊन विवरणपत्र भरले असल्याचे दिसून आले. दरम्यान, २०१४ -१५ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दंडाशिवाय भरण्यासाठी ३१ मार्च २०१६ ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, विवरणपत्र कसे भरावे, कागदपत्रांची पूर्तता, करामध्ये सवलत आदी माहिती कर सल्लागारांकडून घेताना दिसून येत आहे.

लोकमत
टीम :
मंगेश पांडे, नीलेश जंगम,
सुवर्णा नवले, सचिन देव

Web Title: Office of the marchend 'if' online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.