आरटीई अनुदानासाठी लाच घेताना कार्यालय अधीक्षक, लिपिकाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:19 PM2018-03-29T14:19:44+5:302018-03-29T15:30:30+5:30
तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़.
पुणे : आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर करुन रक्कम अदा करण्यासाठी दीड लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेचे कार्यालय अधीक्षक व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून पकडले़. ही कारवाई सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कुल कार्यालयात सकाळी करण्यात आली़.
कार्यालय अधीक्षक शिल्पा सुरेश मेनन (वय ४५, रा.फ्लॅट न २०३, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि लिपिक महादेव मच्छिंद्र सारुख (वय ४७, रा़ यशवंतराव चव्हाण नगर ,डहाणूकर कॉलनी, कोथरुड) अशी त्यांची नावे आहेत़ .
तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़. शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते़. त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे बिल मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते़. हे बिल मंजूर करुन ती रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली़. शिक्षण संस्थेच्या संचालकांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़ या तक्रारीची पडताळणी २५ मार्च रोजी करण्यात आली़. त्यात त्यांनी दीड लाख रुपयांपैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. महावीर जयंती निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने त्यांनी पैसे घेण्यासाठी गुरुवारी येणार असल्याचे सांगितले़. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके, उत्तरा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कुल येथे सापळा रचला़. नॅशनल इंग्लिश स्कुलच्या कार्यालयात सकाळी येऊन शिल्पा मेमन व लिपिक महादेव सारुख यांनी ५० हजार रुपये स्वीकारताच त्यांना पकडण्यात आले़.
................
सुट्टीच्या दिवशी करत होत्या लाचेची मागणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाºया कारवायांमुळे कार्यालय अधीक्षक शिल्पा मेमन या पैशांची मागणी करताना दक्षता घेत होत्या़ कार्यालयीन कामाच्या दिवशी त्या अशा कोणत्याही बाबींबाबत बोलत नसत़ सुट्टीच्या दिवशी आपल्यावर कारवाई होणार नाही, असे त्यांना वाटत होते़ त्यामुळे त्यांनी केलेल्या लाचेची मागणीची पडताळणीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ मार्च रोजी रविवारी केली होती़ त्यात त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती़ गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांनी कोणाला आपल्या कार्यालयात न बोलवता थेट संस्थेच्या कार्यालयात येणार असल्याचा निरोप दिला़ त्यानुसार त्या सकाळी सव्वानऊ वाजताच कार्यालयात पोहचल्या होत्या़ पण, दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकही तयारीत असल्याने सुट्टी असतानाही त्यांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले़