पणन सहसंचालक असणाऱ्या अधिकाऱ्याने नीरा नदीत मारली उडी; रेस्क्यू पथकाचे शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:59 AM2022-10-14T10:59:36+5:302022-10-14T11:00:51+5:30
पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू पथकाच्या मदतीने नदीपात्रात सायंकाळपर्यंत शोधकार्य केले..
नसरापूर :पुणे येथील पणन सहसंचालक असलेले एक वरिष्ठ अधिकारी घरातून बेपत्ता होऊन शिरवळ जवळील नीरा नदीत उडी घेतली असावी, अशी फिर्याद शिरवळ येथील पोलीस ठाण्यात त्यांच्या पुण्यातील नातेवाइकाने दिली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू पथकाच्या मदतीने नदीपात्रात सायंकाळपर्यंत शोधकार्य केले. मात्र, अंधार पडल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे.
शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ४८) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. घोरपडे हे बुधवारी दुपारी कामांसाठी त्यांच्या मित्राचे वाहन घेऊन गेले होते. ते संध्याकाळपर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने नातेवाइकांना शशिकांत घोरपडे घरी आले नसल्याचे सांगितले. त्या दरम्यान, घोरपडे यांनी कारमधून सातारा बाजूकडून जात असताना शिवापूर येथील टोल नाक्यातून गाडी नेल्याने त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर टोल कट झालेला मॅसेज पाहिला. त्यामुळे घोरपडे सातारा बाजूकडे गेल्याचे समजल्याने नातेवाइकांनी पुढे शोध घेत असताना त्यांची गाडी सारोळा नदी लगत आढळून आली. त्यामध्ये घोरपडे यांचे ओळखपत्र, आदी साहित्य मिळून आले.
तसेच तेथील एका हॉटेलात चौकशी केली असता त्यांनी येथे चहा पिल्याचे समजले. तसेच तेथील हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये नीरा नदीचे बाजूने गेले ते परत न आल्याने संशयावरून घोरपडे यांनी नदीच्या पाण्यात उडी घेतली असावी असा कयास करून शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी पहाटे हरविल्याची श्रीकांत पतंगराव घोरपडे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर शिरवळ व राजगड पोलिसांनी महाबळेश्वर रेस्क्यू टीम, भोर येथील भोई राज रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न दिवसभर सुरू होता.
नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे. याबाबत स्पष्टता होत आहे. घटनास्थळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहायक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जल आपत्ती शोधकार्यात सहभागी झाले आहेत.