पुण्यात निवडणूक आयोगाच्या परीक्षेत अधिकारी काठावर पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 09:13 PM2018-06-01T21:13:25+5:302018-06-01T21:13:25+5:30
निवडणूकीच्या प्रकियेबाबत अधिका-यांना कितपत ज्ञान आहे हे पाहण्यासाठी आॅनलाईन पध्दतीनेही परीक्षा घेण्यात आली.
पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने १४ व १५ मे रोजी राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणा-या उपजिल्हाधिकारी, तहसिलदार आणि उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांची परीक्षा घेतली. पुणे विभागातून तब्बल २१६ अधिका-यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, तब्बल ९० टक्के अधिकारी काठावर पास झाले असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रथमच संपूर्ण देशात निवडणूक प्रक्रिये थेट भाग असलेल्या निवडणूक निर्णय अधिका-यांची परीक्षा घेतली. निवडणूकीच्या प्रकियेबाबत अधिका-यांना कितपत ज्ञान आहे हे पाहण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. आॅनलाईन पध्दतीने घेण्यात आलेली ही परीक्षा ३० मार्काची होती. यासाठी ३० प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल एक तासाचा वेळ देण्यात आला होता. या परीक्षेत पास होण्यासाठी २१ मार्क पडणे आवश्यक होते. गेल्या अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडणा-या अधिका-यांनी ही परीक्षा दिली. यासाठी पुणे विभागात अधिका-याकडून जय्यत तयारी करून घेण्यात आली. आयोगाच्या परीक्षेच्या पूर्वी सरावासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून एक पूर्व परीक्षा देखील घेण्यात आली. त्यानंतर यशदा येथे सर्व अधिका-यांची ३० मार्काची आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये परीक्षेच्या वेळी अनेक अधिका-यांकडून कॉपी देखील करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून, यामध्ये ९० टक्के अधिकारी काठावर पास झाले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच अधिका-यांना २५ पेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत.