आषाढी यात्रेसाठी इंसिडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:37+5:302021-07-16T04:09:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : आषाढी यात्रेसाठी पादूका घेऊन जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी ...

Officers appointed as Incident Commander for Ashadi Yatra | आषाढी यात्रेसाठी इंसिडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त

आषाढी यात्रेसाठी इंसिडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : आषाढी यात्रेसाठी पादूका घेऊन जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा पंढरपूर येथे भरते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा गेल्या वर्षभरापासून लागू आहे. त्याअनुषंगाने आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (श्रीक्षेत्र आळंदी देवाची), श्री संत तुकाराम महाराज संस्थान (श्रीक्षेत्र देहू), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान (श्रीक्षेत्र, सासवड), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान (श्रीक्षेत्र, सासवड) या चार पालख्या आठ बसेसद्वारे प्रस्थान करणार आहेत. पादूका घेऊन जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील. याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन कयदा २००५ नुसार अधिकाऱ्यांची इंसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्त इंसिडेंट कमांडर यांनी आषाढी यात्रा २०२१ च्या अनुषंगाने शासनाकडील व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील सूचनांनुसार पुणे जिल्ह्यातील मंजूर चार देवस्थानच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्या अनुषंगाने सुरुवातीपासून ते पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सर्व कार्यवाही इंसिडेंट कमांडर यांनी करायची आहे. संबंधीत उपविभागीय अधिकारी (इंसिडेंट कमांडर) यांनी संस्थानांच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून पादूकांचा मार्ग निश्चित करून याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाशी व सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून योग्य ते नियोजन करावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे.

नियुक्ती याप्रमाणे : १) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी - खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण. २) श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू - हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर. ३) श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड - पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड. ४) श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड-पुरंदरचे नायब तहसीलदार उत्तम बढे.

Web Title: Officers appointed as Incident Commander for Ashadi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.