अधिकाऱ्यांच्या घरी चाकरी
By admin | Published: August 4, 2015 03:32 AM2015-08-04T03:32:14+5:302015-08-04T03:33:07+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) वेतन घेणारे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी चाकरी करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे
राजानंद मोरे, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) वेतन घेणारे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी चाकरी करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करण्यापासून घराच्या साफसफाईपर्यंतची कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांना नातेवाइकांकडे कामात मदत करण्यासाठीही पाठवले जात आहे. मागील काही वर्षांपासून राजरोसपणे हा प्रकार सुरू आहे. हे काम करण्यास नकार दिल्यास त्यांंची अन्यत्र बदली करणे किंवा नोकरीतून काढून टाकण्याचा इशारा दिला जात आहे.
पीएमपीमध्ये स्वच्छता विभागांतर्गत विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून पीएमपीतील काही अधिकाऱ्यांच्या घरी या कर्मचाऱ्यांना तेथील कामे करण्यासाठी पाठविले जात आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सध्या या अधिकाऱ्यांच्या घरी काम करीत असलेल्या व यापूर्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी संवाद साधत या अप्रिय कामावर प्रकाशझोत टाकला.
पीएमपीचे एक तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या घरी काम केलेल्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले, की या अधिकाऱ्याच्या घरी सहा महिने स्वयंपाक व भांडी घासण्याचे काम केले. घराची साफसफाई व कपडे धुण्यासाठी त्यांनी एक महिला कामावर ठेवली होती. त्या वेळी केवळ दोन महिन्यांसाठीच काम करावे लागेल, असे सांगितले होते. त्यामुळे मी काम करण्यास तयार झाले. काम करण्याची जबरदस्ती करण्यात आली होती. दोन महिने काम केल्यानंतर आणखी पुढे काम करण्याचे सांगण्यात आले. सहा महिन्यांनंतर मात्र मी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे माझी घरापासून लांब असलेल्या पीएमपीच्या आगारात बदली करण्यात आली. कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घरीही कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. एका अधिकाऱ्याच्या घरी काम केलेला कर्मचारी म्हणाला, की अधिकाऱ्यांच्या खासगी गाडीवर चालक म्हणून काम करायचो. त्यांच्या नातेवाईक मित्रांसाठीही हे काम करावे लागायचे. सध्या या अधिकाऱ्याच्या घरी तीन कर्मचारी आलटून-पालटून काम करतात. त्यांना भांडी घासणे, घराची साफसफाई करणे, सामानाची ने-आण करण्याची कामे करावी लागत आहेत. सध्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी काम करीत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने लोकमतशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, अधिकाऱ्याच्या घराची स्वच्छता करण्याचे काम सध्या करावे लागत आहे. पीएमपीतील वेळेपेक्षा अधिक काम करून घेण्यात आले. अधिकाऱ्यांच्या घरी आम्हाला काम करायचे नाही. पीएमपीत कुठेही काम दिले तरी आम्ही ते करण्यास तयार आहोत. हे काम करण्यास नकार दिलेल्या एका महिलेची लगेच बदली करण्यात आली.