'बार्टी'च्या महासंचालक पदासाठी अधिकाऱ्यांची लागली ‘शर्यत’; मंत्रालयात 'फिल्डिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:48 PM2020-09-14T12:48:33+5:302020-09-14T12:49:33+5:30
बार्टीच्या महासंचालकपदी कोण येणार? याची उत्सुकता आहे.
धनाजी कांबळे
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) महासंचालकपदाची संधी मिळावी, यासाठी सगळेच अधिकारी इच्छूक असतात. स्थापनेपासून सगळे पुरुष अधिकारी या ठिकाणी महासंचालक म्हणून आले. मात्र, महिला अधिकाऱ्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. आता धम्मज्योती गजभिये यांच्या नावाचा अध्यादेश निघाला असला, तरी अजूनही काही अधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बार्टीच्या महासंचालकपदी कोण येणार? याची उत्सुकता आहे.
बार्टीच्या माध्यमातून अनेक योजना, प्रकल्प राबविले जातात. त्यातून समाजिक, सांस्कृतिक प्रबोधनासह वैचारिक आणि समाजविकासासाठी शाश्वत काम केले जाते. मात्र, दोन-तीन वर्षांपासून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारभार सुरु केल्याने नाराजीचा सूरही आहे. विशेषत: काही अधिकाऱ्यांनी आप्तस्वकीयांची बार्टीत ‘वर्णी’ लावली आहे. मात्र, संस्थेत अनेक वर्षांपासून काम करीत असतानाही पात्र असून काही कर्मचाऱ्यांची बढती थांबवून ठेवली आहे. कोण कर्मचारी जवळचा, मर्जीतला हे पाहून पदोन्नती आणि पगारवाढ देण्याचे काम केले जात आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून समतादूत प्रकल्पाबरोबरच स्पर्धा परीक्षा, आयबीपीएस, कौशल्य विकास अशा प्रकल्पांमधील भ्रष्टाचारासह वेळेवर वेतन होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून समतादूतांना वेतन मिळालेले नाही. तसेच जाहिरातीविनाच पदभरतीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी आवाज उठवल्यामुळेच समतादूत प्रकल्प सुरु राहिला पाहिजे, मात्र त्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्याचप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा नाकारल्याचे प्रकरण 'लोकमत' ने उजेडात आणल्यानंतर मंत्रालयीन पातळीवर याची दखल घेण्यात आली होती. तत्कालीन भाजप सरकारने तत्कालीन महासंचालक कैलास कणसे यांच्याकडे याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी बार्टीतून सेवानिवृत्त होऊ द्या, अशी विनंती केल्याने दोन महिन्यांपासून धम्मज्योती गजभिये यांची फाईल समाज कल्याणमध्ये पडून होती. अन्यथा दोन महिन्यांपूर्वीच गजभिये रुजू झाले असते, अशी माहिती सूत्रांकडून समजली. राज्य शासनाने गजभिये यांची महासंचालकपदी नियुक्ती केल्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र, सध्या दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे बार्टीचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्या नावासह पल्लवी दराडे यांच्या नावाची चर्चा काही महिन्यांपूर्वी महासंचालक पदासाठी होती. आता ही चर्चा मागे पडली असली,तरी प्रेरणा देशभ्रतार यांना महासंचालक पदाची संधी मिळाल्यास बार्टीला प्रथमच महिला अधिकारी मिळेल. याबाबत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही. देशभ्रतार यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यापासून बार्टीत नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. चुकीला माफी नाही, अशा पद्धतीने त्यांनी कामांचा आणि बैठकींचा धडाका लावला आहे. संस्थेच्या नावातच संशोधन हा शब्द असताना या ठिकाणी जबाबदार पदावर काम करणाऱ्या प्रकल्प संचालक, व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी यांनी कधी संशोधन पेपर सादर केला आहे का, असाही सवाल करून त्यांनी सर्वांना संशोधन पेपर सादर करण्याची सूचना केली आहे, असे समजते. संशोधन विभागाच्या संचालकांना आदेश देऊन सर्वांकडून संशोधन पेपरची तयारी करून घेण्याची सूचना केली आहे.
---
गजभिये यांच्या नावाचा अध्यादेश निघाला आहे. आता ते केंद्र सरकारअंतर्गत टपाल खात्यात कार्यरत आहेत. त्यामुळे तिकडून त्यांना रिलिव्ह केल्यावर ते बार्टीचा पदभार स्वीकारतील. आणखी कुणी फिल्डिंग लावून असले, तर त्याची मला माहिती नाही.
- शाम तागडे, प्रधान सचिव, समाज कल्याण