अधिकारी, ग्रामस्थांच्या मध्यस्थीने उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:18 PM2018-08-29T23:18:41+5:302018-08-29T23:19:06+5:30
ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीसमोर अजित जाधव व जयप्रकाश राऊत यांनी
वडगाव निंबाळकर : ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीसमोर अजित जाधव व जयप्रकाश राऊत यांनी सुरू केलेले उपोषण पंचायत समिती अधिकारी व ग्रामस्थांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले.
जयप्रकाश राऊत यांच्या घरासमोरील ग्रामपंचायतीच्या जागेत ग्रामपंचायत सदस्याने शेड बांधून अतिक्रमण केले आहे. गेल्या वर्षी हे अतिक्रमण हटविण्याबाबत उपोषण सुरू केले होते. या वेळी अतिक्रमण काढू असे आश्वासन देण्यात आले होते. पंचायत समिती जिल्हा परिषदेने सदर अतिक्रमण काढावे, असे ग्रामपंचायतीला कळविले असूनही ग्रामपंचायतीने ते काढले नाही. सदस्याला ग्रामपंचायत पाठीशी घालत आहे. अतिक्रमण त्वरित काढावे, या मागणीसाठी उपोषण धरले होते. अजित जाधव यांनी आपल्या जागेत शेजाऱ्याने अतिक्रमण करून बांधकाम चालवलेले आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या; पण त्याची दखल घेतली नाही. पंचायत समितीकडे तक्रार केली होती; पण काही उपयोग झाला नाही. बांधकाम थांबविण्याबाबत कोणतीही कडक पावले उचलली नाहीत. बांधकाम थांबवावे, जागा मोकळी करून द्यावी या मागण्यांसाठी उपोषण केले होते.
सोमवारी (दि.२७) ग्रामपंचायतीसमोर दोघेही उपोषणासाठी बसले. दरम्यान पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे, एल. एल. वाघ या दोन्ही अधिकाºयांनी उपोषणकर्त्यांचे मत जाणून घेतले. उन्मेष शिंदे, सुनील माने, मनोजकुमार साळवे, दत्तात्रय खोमणे, अजित भोसले, बाळासो. शिंदे, भीमराव साळुंके, प्रकाश जाधव, प्रशांत दरेकर, ग्रामसेवक स्वाती ताकवले, जितेंद्र साळुंके यांनी चर्चेत सहभाग घेऊन मध्यस्थी केली. अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळताच अतिक्रमणे हटवली जातील, असे लेखी आश्वासन दिले. यामुळे उपोषण सोडण्यात आले.