Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 08:02 PM2022-05-19T20:02:41+5:302022-05-19T20:03:15+5:30
शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची २१ ते २८ मे दरम्यान पुण्यात सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु ठिकाण मात्र ठरत नव्हते. सुरुवातीला सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे सभेची जागा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर मुळा - मुठा नदीपात्रात २१ मेला जागा फिक्स करण्यात आली. पण तिथेही पावसाचे कारण देऊन पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर आज मनसेने रविवारी पुण्यात सभा होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे.
येत्या १० दिवसांच्या आत राज ठाकरेंची सभा पुण्यात होईल असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला असल्याचे सुत्रांकडून समजल होत. स्वतः राज ठाकरे पुण्यातील सभेबद्दल माहिती देतील असंही सांगण्यात आले होते. आज दिवसभर त्याबद्दलच कार्यकर्त्यांची चर्चा सुरु होती. पण अखेर राज ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवताच सभेचे ठिकाण, वेळ आणि तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार
औरंगाबाद, ठाणे या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्व, भोंगे अशा विषयांवर भाष्य केले. तर शरद पवारांबरोबरच महाविकास आघाडीवर टीका केली. आता पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.