विद्यापीठ देईना विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:22 AM2018-07-02T05:22:44+5:302018-07-02T05:23:27+5:30

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्रच दिले जात नाही.

 The official ID card for the students of the University | विद्यापीठ देईना विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र

विद्यापीठ देईना विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र

googlenewsNext

- दीपक जाधव

पुणे : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्रच दिले जात नाही. विद्यार्थ्यांना सगळीकडे ओळखपत्राची आवश्यकता पडत असल्याने ते स्वत:च पैसे गोळा करून आपापली ओळखपत्रे छापून घेत आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
जगातील कुठलीही शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय, खासगी अथवा स्वयंसेवी संस्था असतो, त्याच्या सदस्यांना पहिल्यांदा ओळखपत्र दिले जाते. ओळखीचा पुरावा म्हणून तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असते. विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये ओळखपत्र ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ओळखपत्रामध्ये संबंधीत विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, रजिस्टर क्रमांक, रक्तगट, फोटो आदी महत्त्वपूर्ण माहिती असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मात्र अद्यापही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याची गरज वाटलेली नाही.
विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान, लॉ, व्यवस्थापन आदी शाखांचे पदव्युत्तर शिक्षणाचे ५२ विभाग आहेत. या विभागांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना विद्यापीठाकडून केंद्रीकृत पद्धतीने विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाणे आवश्यक आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतके जुने असूनही अशी केंद्रीकृत ओळखपत्र देण्याची व्यवस्था विद्यापीठाने उभी केलेली नाही. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना विविध कारणांसाठी ओळखपत्रांची गरज भासते. अगदी बसच्या पासपासून ते आरोग्य केंद्रात उपचार घेण्यापर्यंत सगळीकडे ओळखपत्राची मागणी केली जाते. त्याचबरोबर काही वेळेस सुरक्षारक्षकांकडूनही ओळखपत्र दाखविण्यास सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विभागप्रमुखांकडे सातत्याने ओळखपत्रांची मागणी केली जायची. मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याचीच व्यवस्था नसल्याने संबंधित विभागांनी त्यांच्या पातळीवर अनेक बेकायदेशीर फंडे शोधून काढले आहेत. प्रत्येक विभागने त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याची वेगवेगळ्या अनधिकृत व्यवस्था उभारल्या आहेत. काही विभागांमध्ये विद्यार्थीच पैसे गोळा करून स्वत:चे ओळखपत्र तयार करून घेतात, तर काही विभागांमध्ये विभागप्रमुखांकडून खासगी व्यक्तीच्या माध्यमातून ओळखपत्र तयार करून दिले जाते. मात्र विद्यार्थ्यांची सर्व एकत्रित माहिती खासगी व्यक्तीच्या ताब्यात जात असल्याने त्यातून सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठ प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सुरक्षेला मोठा धोका
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसची सुरक्षा भक्कम करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. नुकतेच कॅम्पसमधील सुरक्षारक्षकांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे.
मात्र प्रत्यक्षात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याची महत्त्वाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. यातून विद्यापीठाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुलगुरूंना पडला विसर
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने विद्यापीठाकडून अधिकृत ओळखपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
मात्र त्याला आता वर्ष उलटून गेले तरी अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.

कुणीही सहज बनवू शकतो
बोगस ओळखपत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याची व्यवस्थाच नाही. अनेक विभागांमध्ये विद्यार्थीच पैसे गोळा करून आपापले ओळखपत्र बनवून घेतात. त्यामुळे कुणीही सहजपणे विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे बोगस ओळखपत्र बनवून विद्यापीठात वावरू शकतो. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
- सतीश गोरे, अध्यक्ष, एनएसयूआय,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title:  The official ID card for the students of the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.