रेल्वे उड्डाणपुलाच्या चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना भेट नाकारली
By admin | Published: March 26, 2017 01:16 AM2017-03-26T01:16:02+5:302017-03-26T01:16:02+5:30
भिगवण रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या विरोधाबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कृती समितीच्या
भिगवण : भिगवण रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या विरोधाबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी भेट नाकारली. कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांनी भिगवण गावच्या महिला सरपंच हेमाताई माडगे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि उड्डाणविरोधी कृती समितीच्या ५० हून अधिक ग्रामस्थांना भेट नाकारल्याने भिगवण ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता धनंजय धुमाळ यांनी सरपंच आणि उड्डाणपूलविरोधी कृती समितीच्या सदस्यांना पुलाविषयी चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे भिगवण येथे येणार असल्याचे सांगितले. तसेच भिगवण येथील बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात सकाळी १० वाजता हजर राहण्याविषयी सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे बडे अधिकारी येणार असल्याने भिगवण गावच्या सरपंच हेमाताई माडगे यांनी सर्व सदस्य आणि उड्डाण पूल विरोधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना निरोप देवून १० वाजता विश्रामगृहात पोहोचले. तसेच, अधिकाऱ्यांचीवाट पाहिली. सुमारे चार तासांचा अवधी उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्याने या ठिकाणी थांबलेल्या ग्रामस्थ आणि सरपंच यांची भेट घेतली नाही. तसेच तीन वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर अभियंता धुमाळ यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ‘साहेब’ परस्पर पुलाच्या जागेला भेट देऊन पुण्याकडे रवाना झाल्याचे सांगितले. उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी सांगितले, की कार्यकारी अभियंता येणार असल्याचे समजल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थ आपले कामधंदे सोडून उपाशीपोटी वाट पाहत होते. (वार्ताहर)