आॅनलाईनमुळे कार्यालये झाली ‘आॅफलाईन’

By admin | Published: April 2, 2017 02:51 AM2017-04-02T02:51:07+5:302017-04-02T02:51:07+5:30

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी शहरातील विविध कार्यालये दरवर्षीप्रमाणे गजबजलेली पाहायला मिळतील

Offline office due to 'offline' | आॅनलाईनमुळे कार्यालये झाली ‘आॅफलाईन’

आॅनलाईनमुळे कार्यालये झाली ‘आॅफलाईन’

Next

पिंपरी : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी शहरातील विविध कार्यालये दरवर्षीप्रमाणे गजबजलेली पाहायला मिळतील अशी आशा होती. मात्र, आॅनलाईन भरणा पद्धतीमुळे आयकर विभाग, दुय्यम निबंधक, वीजबिल, महापालिका करसंकलन आदी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.
पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हटले जाते. या शहरात अनेक लहान-मोठे उद्योग असल्याने शहरातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकांचा आयकरही मोठ्या प्रमाणात जमा होतो. दरवर्षी या आयकरसंबंधी कागदपत्रांची पूर्तता व तत्सम कामांसाठी आकुर्डी येथील आयकर विभागाच्या कार्यालयात ३१ मार्चला गर्दी पहायला मिळत असते. यंदा मात्र या कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला. शासनाने सध्या नागरिकांच्या सोईसाठी आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी आॅनलाईन अर्जपद्धती आणि कर भरणापद्धती सुरू केली आहे.
याबाबत संबंधित विभागाकडून वारंवार जागृती केली जात होती. याचाच परिणाम म्हणून आयकर भरण्यासाठी नागरिकांकडू आॅनलाईन प्रणालीचा वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या कार्यालयात नागरिकांची तुरळक ये-जा पाहायला मिळाली. या संगणकप्रणालीचा वापर केला जाऊ लागल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आणि नागरिकांचा वेळ आणि त्रासही वाचला आहे.
महावितरणकडूनही वर्षाच्या शेवटी थकीत बिले जमा ग्राहकांकडून जमा व्हावीत, यासाठी बिलात सूटही दिली जाते. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटी वीजबील भरणाकेंद्राबाहेरही गर्दी पहायला मिळते. मात्र यावर्षी असे चित्र क्वचित पहायला मिळाले. महावितरणने आॅनलाईन बील भरण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. ग्राहकांकडूनही त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे रांगेतील गर्दी कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती निगडी प्राधिकरण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पहायला मिळाली. या कार्यालयातदेखील नेहमीप्रमाणेच नागरिकांची ये-जा पहायला मिळाली. मिळकत कर भरण्यासाठी महानगरपालिकेकडूनही ३१ मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती.
महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयांचर तसेच करसंकलन केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. महापालिकेचा मिळकत कर भरण्यासाठी आॅनलाईन प्रणालीची सोय करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन कर भरणे पसंत केले.
शेवटच्या दिवशी विविध कार्यालयांवर दरवर्षी गर्दी होत असते. या गर्दीत अडकायला नको म्हणून अनेकजणांनी दोन-तीन दिवस अगोदरच करसंबंधी कामे उरकून घेतली आहेत. त्यामुळेही विविध कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Offline office due to 'offline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.