बापरे ! पुणे जिल्ह्यात ७४६ ग्रामपंचायतींसाठी २१,७७१ उमेदवारांचे अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 01:50 PM2020-12-31T13:50:37+5:302020-12-31T13:51:36+5:30
अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी सर्व तहसिलदार कार्यालयात प्रचंड गर्दी आणि गोंधळ
पुणे: जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या सर्वच तालुक्यात उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. त्यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा सर्व्हर काही काळ बंद पडल्याने या गोंधळात अधिकच भर पडली. अखेर जिल्ह्यातील 6 हजार 980 जागांसाठी 21 हजार 771 उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत होती. परंतु ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करताना चांगलीच तारांबळ उडाली . त्यात अर्ज दाखल शेवटचा दिवस असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने कोरोनाच्या सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा पुरता फज्जा उडाला.
------
जिल्ह्यात निवडणुका होणा-या ग्रामपंचायती : 746
- एकूण सदस्य संख्या : 6980
- एकूण प्रभागांची संख्या : 2691
- एकूण मतदान केंद्रे : 3008
------
- पुरूष मतदार : 8 लाख 59 हजार 996
- स्त्री मतदार : 7 लाख 86 हजार 559
- यावेळी पहिल्यांदा मतदान : 1 लाख 65 हजार
------
जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या व दाखल झालेले अर्ज
खेड -91( 2028) भोर-73( 1264) शिरूर-71(2585), जुन्नर-66(1691) पुरंदर-68(1662), इंदापूर-60(2291), मावळ - 57(1596), हवेली- 54(1802), बारामती- 52(2255), दौंड - 51(2272), मुळशी - 45(1149), वेल्हा - 31(430), आंबेगाव- 29(746) एकूण : 746
---------
किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार 4 जानेवारीला कळणार
पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 21771उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची गुरुवार (दि.31) डिसेंबर रोजी छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी आहे. यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे 4 जानेवारीला निश्चित होईल. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या बोली लावल्या जात आहेत.
------