अबब..! तब्बल पाच लाख रुपये मोजून पुणे महापालिका करणार फक्त १ वृक्ष खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:56 PM2020-08-17T16:56:54+5:302020-08-17T17:00:43+5:30
गुलटेकडी येथील भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या दबावातून पुणे महापालिकेच्यावतीने हे टेंडर काढण्यात आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप
पुणे : सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी येथील पुनावाला उद्यानात वृक्षारोपण करण्याकरिता, तब्बल पाच लाख २८ हजार रुपयांना एक वृक्ष खरेदी करण्याचे टेंडर महापालिकेच्या वतीने काढले गेले आहे. विशेष म्हणजे या टेंडरच्या माध्यमातून फक्त ६५ वृक्ष खरेदी केले जाणार असून, त्याची किंमत तब्बल ३ कोटी ४३ लाख ५० हजार एवढी होत आहे.
गुलटेकडी येथील भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या दबावातून पुणे महापालिकेच्यावतीने हे टेंडर काढण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. सन २०१८ साली या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. त्यामुळे सध्या या कामाची मुदत संपली असताना वृक्ष खरेदी का करायची आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवाय टेंडरची तब्बल २ वर्षाने मान्यता घेतली जाते हे कोणता नियमात बसते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या वृक्षांची महापालिकेच्या दरसुचीमध्ये (डीएसआर) मध्ये नोंद नाहीत. तसेच इस्टीमेट समितीची मान्यता नसताना हे टेंडर दबावाखाली काढण्यात आले आहे. २ कोटी ५८ लाख रुपयांचे मूळ टेंडर असताना, टेंडर दरापेक्षा ८५ लाख रुपयये जास्त दराने हे टेंडर आले आहे. टेंडर दर वस्तुस्थिती व बाजार भावाशी सुसंगत नसल्याचे उद्यान विभागाने म्हटले असताना हे टेंडर मान्यतेसाठी पाठविण्याबाबत सत्ताधारी भाजपाचे नेते प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप ही जगताप यांनी यावेळी केला.