अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:07 PM2023-06-03T13:07:18+5:302023-06-03T13:07:34+5:30
दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले
बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सख्ख्या मावस भावंडांना दहावीच्या परीक्षेत समान एकसारखे गुण मिळाले आहेत. बारामतीतल्या या योगायोगाचे चांगलेच कौतुक होत आहे. दोघांनाही एकूण गुणांपैकी ३०३ म्हणजेच ६०.६० टक्के गुण मिळाले आहेत.
अंजनगाव येथील आरती प्रशांत कुचेकर व तिचा मावसभाऊ कुणाल सकट अशी या भावंडांची नावे आहेत. शुक्रवारी (दि. २) दहावीचा निकाल जाहीर झाला. सर्वत्र दहावी निकालाबाबत चर्चा सुरू असतानाच या दोघा भावंडांना एकसारखे गुण मिळाल्याची माहिती समोर आली. यानंतर या योगायोगाचीही जोरदार चर्चा सुरू झाली. सर्वांनी या भावंडांचे कौतुक केले. विशेष म्हणजे आरती हिच्याच घरी कुणाल राहतो, दोघेही एकाच विद्यालयात शिक्षण घेत आहेत.
आरतीला मराठी विषयामध्ये मध्ये ६५, हिंदी ४६, इंग्रजी ४६, गणितात ५८, विज्ञान ६७ व सामाजिकशास्त्र ६७ गुण असे एकूण ५०० गुणांपैकी ३०३ गुण मिळाले आहेत. तर कुणालला मराठीमध्ये ५५, हिंदी ५०, इग्रजी ४६, गणित ४८, विज्ञान विषय ७९, तर सामाजिकशास्त्र विषयात ७१ गुण मिळाले आहेत. त्यालाही ५०० पैकी ३०३ गुण मिळाले आहेत. आरती हिचे वडील प्रशांत कुचेकर हे बारामती शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत, तर कुणाल याचे वडील बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामगार आहेत.