अबब! पुणेकरांनी भरला १३ कोटी रुपये दंड; विनामास्क फिरणार्या तब्बल २ लाख ६६ हजारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 03:51 PM2021-03-26T15:51:46+5:302021-03-26T15:52:26+5:30
एकीकडे पुण्यात कोरोना झपाट्याने वाढतोय, तर दुसरीकडे पुणेकरांमध्ये बेफिकिरी तितकीच दिसून येतेय..!
पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कधीही लॉकडाऊन होऊ शकतो, असे परिस्थिती निर्माण झाली असतानाही नागरिकांचा बेफिकीरपणा कमी होण्याचे नाव घेत नाही. विनामास्क फिरणार्या पुणेकरांनी आतापर्यंत तब्बल १३ कोटी रुपये दंड भरला आहे.
शहरातील आता दररोज नवीन ३ हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिका, पोलीस अधिक कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पुणे शहरात बुधवारी एका दिवसात तब्बल १ हजार १६३ जणांना विना मास्कची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार ७०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली.
आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८३६ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ कोटी ९९ लाख २१ हजार ३०० रुपये दंड करण्यात आला आहे.
पोलीस कल्याणसाठी भरघोस निधी
मास्क कारवाईची जबाबदारी पोलिसांवर सोपवितानाच महापालिकेने दंडातील निम्मी रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे या १३ कोटीपैकी साडेसात कोटी रुपये पुणे पोलिसांना मिळाले आहेत. त्यातून शहरातील सर्व पोलीस ठाणी, पोलीस चौक्यांच्या सुधारणेसाठी निधी पुरविण्यात येत आहे. अनेक विभागांना निधी अभावी जुन्या साधनसामुग्रीवर काम निभावून न्यावे लागत होते. विनामास्क कारवाईतून मिळणार्या निधीचा उपयोग अशा निधीअभावी रेंगाळलेल्या कामांसाठी सध्या वापरण्यात येत आहे.