भेंडी, गवार, कैरी स्वस्त; घेवडा, गाजर वधारले
By Admin | Published: April 17, 2017 06:33 AM2017-04-17T06:33:05+5:302017-04-17T06:33:05+5:30
गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भेंडी, गवार, पावटा,
पुणे : गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भेंडी, गवार, पावटा, काकडी, तोतापुरी कैरी स्वस्त झाली आहे. तर, श्रावणी घेवडा, गाजर यांच्या दरात वाढ झाली असून इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.
मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या फळभाज्यांत हिमाचल प्रदेशमधून २ ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ ट्रक कोबी, गुजरात आणि कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ७ ते ८ टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा इतकी आवक झाली, असे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
स्थानिक मालामध्ये सातारी आल्याची १४०० ते १५०० पोती, टॉमेटो साडेपाच ते ६ हजार क्रेट्स, फ्लॉवर १८ ते २० टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, शेवगा ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, चिंच २५ ते ३० पोती, गावरान कैरी ७ ते ८ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, गुजरात, आग्रा, इंदूर आणि स्थानिक बटाट्याचे मिळून ६० ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेपाच ते ६ हजार गोण्यांची आवक झाली, असेही भुजबळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालेभाज्यांचे दर स्थिर
मार्केट यार्डात रविवारी पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या १ लाख ५० हजार जुड्यांची, तर मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असली तरी सर्वच पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले.
पालेभाजांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे : कोथिंबीर : ५००-१४००, मेथी : ८००-१२००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-६००.
फुलांची मागणी घटली
लग्नसराईचा हंगाम सुरू असला तरी लग्नाच्या तिथी आहेत. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होत आहे. मात्र, सर्व फुलांचे भाव टिकून आहेत. गेल्या आठवड्यात हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे सर्व प्रकारच्या फुलांना चांगले दरही चांगले मिळाले. पुढील आठवड्यात अक्षयतृतीया असल्यामुळे फुलांना मागणी वाढेल आणि दरही वाढतील, अशी शक्यता फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केली.
डाळिंब झाले स्वस्त; लिंबू, मोसंबी, पपई महाग
मार्केट यार्डात फळबाजारात फळांची मागणी वाढल्याने लिंबू, मोसंबी, पपई यांच्या दरात वाढ झाली आहे. तर आवक वाढल्याने डाळिंबाच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली. कलिंगड, खरबुजाचे दर टिकून आहेत. उन्हाळ्यामुळे लिंबाला मोठी मागणी असल्याने लिंबाला चांगला दर मिळत आहे.