VIDEO: ओला गाडी बुक केली अन् गुंड गणेश मारणे फसला; 'असा' होता मारणेच्या अटकेचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:39 AM2024-02-01T11:39:51+5:302024-02-01T11:43:56+5:30
गणेश मारणे हा शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार....
- किरण शिंदे
पुणे : गँगस्टर शरद मोहोळच्या खुनानंतर पसार झालेल्या कुख्यात गुंड गणेश मारलेला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पिंपरी-चिंचवड परिसरातील नाशिक फाटा नजीक असणाऱ्या स्पाईन रोड परिसरातून बुधवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. गणेश मारणे हा शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
५ जानेवारी रोजी राहत्या घराजवळ गोळ्या झाडून गँगस्टर शरद मोहोळचा खून करण्यात आला होता. त्याच्या खुनानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. टोळी युद्धातून हा खून झाल्याने मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुख्य मारेकऱ्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर तपासा दरम्यान गुंड विठ्ठल शेलार याच्यासह १६ जणांना या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली होती. तर मुख्य सूत्रधार असलेला गणेश मारणे पसार झाला होता. गुन्हे शाखेची विविध पदके राज्यभर त्याचा शोध घेत होती. अखेर बुधवारी सायंकाळी त्याला पिंपरी चिंचवड परिसरातून अटक करण्यात आली.
शरद मोहोळ खून प्रकरणात आपले नाव आल्याचे माहित झाल्यानंतर गणेश मारणे पसार झाला होता. गुन्हे शाखेची काही पथके त्याच्या मागावर होती. मात्र तो काही सापडत नव्हता. सुरुवातीला त्याने सोलापूर, बेंगलोर, हैदराबाद या शहरात काही काळ घालवला. मात्र या काळातही पोलीस त्याच्या मागावर होते. कोणत्याही ठिकाणी तो दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ राहत नव्हता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा सापडण्यात अडचणी येत होत्या. काही दिवसांपूर्वी तो केरळ राज्यात पळून गेला होता. त्या ठिकाणीही गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. मात्र याच काळात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे वकिलाची भेट घेण्यासाठी तो पुण्याकडे येण्यासाठी निघाला होता. त्याची आणि वकिलाची मध्येच कुठेतरी भेट होणार होती. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
ओला गाडी बुक केली आणि इथेच फसला...
केरळवरून निघालेला गणेश मारणे बुधवारी भुसावळ जंक्शन येथे उतरला. तिथून तो सकाळीच नाशिकला पोहोचला. दरम्यान गुन्हे शाखेची टीम त्याच्या मागावर होतीच. तांत्रिक विश्लेषणातून तो नाशिकला पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या काही टीम नाशिकच्या दिशेने रवाना झाल्या. यादरम्यान गणेश मारणे पुण्याच्या दिशेने येण्यासाठी निघाला होता. संगमनेर परिसरात तो ट्रेसही झाला होता. यादरम्यान गुन्हे शाखेची दोन पथके मोशी परिसरात सापळा लावून सज्ज होते. मात्र यावेळी पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी ठरला.
दरम्यान मधल्या काळात गणेश मारणे हा बसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरून जाणाऱ्या बसेस तपासण्यास सुरुवात केली. ३ बस तपासल्यानंतरही गणेश मारणेला सापडला नाही. यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक विश्लेषण केले असता ज्या मोबाईल क्रमांकावरून गणेश मारणे याने ओला गाडी बुक केली होती तो क्रमांक मिळाला. तो मोबाईल क्रमांक ओला कंपनीचा होता. पोलिसांनी त्या मोबाईलशी संपर्क साधत गाडीचे लाईव्ह लोकेशन मिळवले. त्यानंतर ही गाडी भोसरी परिसरातील स्पाईन रस्त्यावर ट्रेस झाली. लगेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून ही गाडी अडवली आणि गाडीत निवांत बसलेल्या गणेश मारणेच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोघे होते. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, क्रांतीकुमार पाटील, श्रीहरी बहिरट आणि त्यांच्या पथकाने केली.