जागो ग्राहक जागो...ओला, विमा आणि टुरिस्ट कंपन्यांना ग्राहक मंचाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:26 PM2022-03-15T13:26:43+5:302022-03-15T13:30:02+5:30
पुणे : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा होतो. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ पासून अस्तित्वात आहे. ...
पुणे : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा होतो. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ पासून अस्तित्वात आहे. केंद्र सरकारने जनजागृतीसाठी ‘जागो ग्राहक जागो’, ही संकल्पना घेऊन त्याच नावाने स्वतंत्र वेबसाईट निर्माण केली आहे. ग्राहकांना न्याय मिळतो, याची साक्ष देणारे पुण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अलिकडेच दिलेले हे तीन निकाल.
ओला कंपनीला दणका
तक्रारदारांना मुलीला भेटण्यासाठी हाँगकाँगला जायचे होते. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी त्यांनी ओला ॲपद्वारे कॅब बुक केली. दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. पण कॅब आलीच नाही. शेवटी दुसरी कॅब करून त्यांना जावे लागले. तक्रारदार अंजली दातार यांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. ती अतिरिक्त जिल्हा आयोगाकडे वर्ग करण्यात आली. सेवा देण्यात टाळाटाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रासापोटी १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश आयोगाने दिला.
कृषी अपघात विमा प्रकरणी महिलेला न्याय
आनंदा (आनंदराव) काशीनाथ सुतार हे शेतकरी होते. साताऱ्यावरून कऱ्हाडला मिनी बसने जात असताना ट्रकला मिनी बसची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने कृषी अधिकाऱ्याकडे विम्याचा दावा दाखल केला. मात्र, विमा कंपनीने नावातील बदल आणि ६ क चा वारसा नोंदीचा उतारा मुदतीत दाखल न केल्याने क्लेम नाकारला. पत्नीने तक्रार दाखल केली. शेतकरी अपघात नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये नुकसान भरपाईची वार्षिक ७ टक्के व्याजदरासह द्यावी, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.
टुरिस्ट कंपनीला व्याजासह द्यायला लावली भरपाई
सहलीसाठी पैसे भरूनदेखील दोनदा सहल रद्द झाल्याने मानसिक त्रास झालेल्या चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाला. सहलीसाठी भरलेले ६८ हजार रुपये २२ जून २०२० पासून १० टक्के व्याजाने परत द्यावे, असा आदेश ग्राहक तक्रार आयोगाने दिला.
nतसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार, तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.