ओल्ड इज अलवेज ‘गोल्ड ’...... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 05:36 PM2018-07-17T17:36:45+5:302018-07-17T18:11:21+5:30

इतरांसारखेच आयुष्यामागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका हटके आयुष्याचा प्रवास... जाणून घेऊया.. नेमकी काय आहे गोष्ट..

Old is Always 'Gold' | ओल्ड इज अलवेज ‘गोल्ड ’...... 

ओल्ड इज अलवेज ‘गोल्ड ’...... 

googlenewsNext
ठळक मुद्देकाळाच्या पडद्याआड गेलेल्या दुचाकींचा संग्राहकआजदेखील संग्रहित असलेल्या सर्व गाड्या चांगल्या शोरूम कंडिशनमध्ये राजदूत, येझडी, जीटीएस बॉबी, बजाज सुपर गाड्यांचा समावेश

दीपक कुलकर्णी 
पुणे : जुनं ते सोनं अशी आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे.. त्यामुळे जुनी गाणी, वस्तु, पुस्तके, चित्रपट, सायकल , दुचाकी, चारचाकी गाडी असे सर्व काही..पुढे जगणे कितीही प्रगतीपथावर धावले तरी अंतर्मनातला एक कप्पा ‘ जुन्या-पुरान्या ’ गोष्टींसाठी राखीव असतो. पण त्याच जुन्या गोष्टी जतन करणे काहींच्या आयुष्याचा भाग होऊन जातो..आणि तसाही छंद नसणारा माणूस या जगात सापडणे कठीणच..  ‘ओल्ड इज अलवेज गोल्ड ’ असं तत्व आयुष्यभर जपत विस्मृतीत गेलेल्या पन्नास, साठ , सत्तर वर्षांच्या दुर्मिळ गाड्या हुडकुन काढत त्यांना जतन करणारा हा अवलिया माणूस म्हणजे सॅलिसबरी पार्क येथे राहणारे अशोक धुमाळ... 
    मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेलं हे व्यक्तिमत्व.. इतरांसारखेच आयुष्यमागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका अविस्मरणीय आयुष्याचा प्रवास...जुन्या काळच्या गाड्या जमविण्याचा हा छंद त्यांचे अख्खं आयुष्यच व्यापून टाकतो. या माणसाकडे १९६९, ७२ सालच्या अशा गाड्यांचा सुंदर संग्रह आहे. ज्यांचे दिसणेच नव्हे, तर नावे ही सध्या दुरापास्त गोष्ट. त्यातलीच एक म्हणजे १९७३ साली आलेल्या बॉबी चित्रपटात वापरण्यात आलेली व त्यावेळेस लाखो तरुणांच्या दिलाची धडकन ठरलेली राजदूत जीटीएस. अर्थातच बॉबी. यांसारख्या एकाहून एक लक्षवेधी व भन्नाट गाड्या या माणसाच्या संग्रहात आहे. 
धुमाळ यांच्याकडे सध्या जावा, राजदूत, येझडी, जीटीएस बॉबी, बजाज सुपर अशा गाड्यांचा संग्रह आहे. त्यांना त्याकाळी कुटुंबाची हलाखीची परिस्थिती व नवीन रोल गाड्यांची किंमत यांचा ताळमेळ घालणे परवडण्याजोगे नव्हते. मग त्यांनी याच गाड्या स्वत: जशाच तशा स्वरूपात घरी तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले. या गाड्यांची निर्मिती करताना कधी कधी त्यांना एका एका पार्टच्या शोधासाठी पायाला भिंगरी लावत जिल्हे, राज्ये, पालथी घालावी लागली. एक एक गाडी तयार करण्यासाठी महिने, वर्ष सरत होती. परंतु तयार केलेल्या गाडीकडे जेव्हा रस्त्यावरची माणसे आश्चर्यकारक भावमुद्रेने पाहत होते तेव्हा त्यांना आपल्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटत असे.
धुमाळ म्हणाले, आजदेखील संग्रहित असलेल्या सर्व गाड्या चांगल्या शोरूम कंडिशनमध्ये आहे. २५०, १५०, १७५ सीसीच्या या गाड्या आहेत. अगदी निश्चिंतपणे या सर्व गाड्या लांब पल्ल्याच्या दौºयावर घेऊन जातो. ही सर्व वाहने त्रासदायक ठरत नाहीत आणि जरी समजा प्रवासात काही समस्या उद्भवली तरी ती सहज दूर होऊ शकते. गाड्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे यांची दुरुस्ती कुणालाही सहज जमू शकते. परंतु सिग्लनवर उभा असलो तरी नवीन बुलेट गाडीपेक्षा या जुन्या गाड्या तरुणाईला आकर्षित करून घेत असतात. मध्यंतरी राजदूत या गाडीचे टायर हवे होते. त्याच्या शोधाकरिता कोपरगाव, शिर्डी, बडोदा अशा विविध ठिकाणी फिरलो. पण ते काही केल्या मिळेना. ते शेवटी मला बंगळूर व बेळगावला मिळाले. माझ्यामुळे या गाड्यांविषयी मुलाला व मुलीला देखील प्रचंड जिव्हाळा निर्माण झाला आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले. मुलीच्या लग्नात लग्नमंडपातली एंट्रीदेखील तिने मैत्रिणींसह गाड्यांवर केली

........

जेव्हा हा पहाडासारखा माणूस गाड्यांच्या विरहात ढासळतो...
हाच माणूस जेव्हा आर्थिक संकटापुढे नतमस्तक होताना आपल्याकडे असलेल्या १९५९, ६९ सालच्या फियाट गाड्या विकाव्या लागल्या हे सांगतो तेव्हा नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात. तसेच काही स्पेअरपार्ट मिळत नसल्यामुळे ५० सीसीची व्हिक्टोरिया म्हणजे विकी आणि सुवेगा या गाड्या स्क्रॅप कराव्या लागल्या हे सांगताना तो खूप हळवा होतो. रात्री व दिवसा जेव्हा कधी निवांत वेळ मिळतो त्याक्षणी या गाड्यांकडे पाहतो तेव्हा मोठे समाधान मिळते. 

Web Title: Old is Always 'Gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.