जुन्या-नव्या पिढीचा आविष्कार ‘सवाई’त!
By admin | Published: November 26, 2015 12:42 AM2015-11-26T00:42:35+5:302015-11-26T00:42:35+5:30
प्रसिद्ध गायक पं. राजन-साजन मिश्रा, पं.जसराज, पं उल्हास कशाळकर, गायिका मालिनी राजूरकर यांसारख्या संगीतातील दिग्गज शिरोमणींसह सावनी कुलकर्णी
पुणे : प्रसिद्ध गायक पं. राजन-साजन मिश्रा, पं.जसराज, पं उल्हास कशाळकर, गायिका मालिनी राजूरकर यांसारख्या संगीतातील दिग्गज शिरोमणींसह सावनी कुलकर्णी, शिल्पा पुणतांबेकर, सुचिस्मिता दास, अमजद अली, भारती प्रताप अशा विविध सात नव्या पिढीच्या कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’’त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवात पहिल्यांदाच सुरेश वाडकर यांची अभिजात संगीताची मैफिल रंगणारआहेआणिहे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
गायन,वादन आणि नृत्य याच्या त्रिवेणी मिश्रणातून साकार झालेला ‘६३ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे येत्या दि.१० ते १३ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होणार आहे. महोत्सवाचे वेळापत्रक आणि कलाकारांची नावे बुधवारी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
महोत्सवात तब्बल २४ नामवंतांसह युवा कलाकार आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची ( दि. १०) सुरूवात पुण्याच्या नम्रता गायकवाड हिच्या सनई वादनाने होणार आहे.त्यानंतर गायक पं. भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतील सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर यांचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे. किराणा घराण्याचे पं. विश्वनाथ यांचे गायन तसेच मल्हार कुलकर्णी यांचे शिष्य रूपक कुलकर्णी व प्रवीण शेवलीकर यांचे बासरी व व्हायोलिन सहवादनानंतर ख्यातनाम गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाने उत्तरार्धाची सांगता होईल.
पं. अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या व पतियाला घराण्याच्या गायिका सुचिस्मिता दास या युवा कलाकाराच्या गायनाने दुस-या दिवशी ( दि. ११) चा प्रारंभ होणार असून, मशकूर अली खां यांचे शिष्य किराणा घराण्याचे युवा गायक अमजद अली यांच्या गायनानंतर आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतारवादक नीलाद्री कुमार यांचे सतारवादन होईल. मेवाती घराण्याचे गायक पं. जसराज यांच्या गायनाने दुसऱ्या दिवशीचा समारोप होईल. गायिका ललित राव यांच्या शिष्या व आग्रा घराण्याच्या गायिका भारती प्रताप यांचे गायन तसेच जयपूर घराण्याचे रघुनंदन पणशीकर यांचे गायन, प्रसिद्ध बासरीवादक व्यंकटेश गोडखिंडी यांचे शिष्य प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन अशी सुरेल पर्वणी रसिकांना तिसऱ्या दिवशी (दि.१२) मिळणार आहे. त्यानंतर जयपूर घराण्याचे ज्येष्ठ नर्तक व दुर्गालाल यांच्या परंपरेतील राजेंद्र गंगाणी यांचा कथ्थक नृत्याविष्कार रसिकांना अनुभवता येईल. पं.भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी यांचे गायन होईल. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा अशा तिन्ही घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे गजानन बुवा यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने उत्तरार्धाची समाप्ती होईल.
महोत्सवाचा शेवटचा दिवस ( दि. १३) सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात रंगणार आहे. सकाळच्या सत्रात पं. शौनक अभिषेकी यांचे गायन, ध्रुव घोष यांचे सारंगीवादन होईल. ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांची अभिजात गायकी रसिकांना अनुभवायला मिळेल. यावर्षी गायक नानासाहेब देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा हा शेवटचा दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)