पुणे: मांजरी खुर्दमध्ये मातीखाली दबलेला जुना ग्रेनेड आढळला, पोलीस घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 02:31 PM2022-07-26T14:31:22+5:302022-07-26T14:37:16+5:30
परिसरात एकच खळबळ उडाली होती....
हडपसर: मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या जवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे मांजरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तो जुना ग्रेनेड असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजूला बॉम्ब सदृश वस्तू अभिमान रोहिदास गायकवाड यांना दिसून आली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस पाटील अंकुश उंद्रे यांना दिली. उंद्रे यांनी तत्काळ हि माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोध पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी ८ वर्षापूर्वी भराव टाकण्यात आला होता. त्यामध्ये दबलेला जुना ग्रेनेड आढळून आलेला आहे. पावसामुळे ते वर आल्याचे दिसत आहे. तरी, पुढील तपास लोणीकंद पोलीस आणि बॉम्ब शोध पथक करीत आहेत