रस्त्याच्या कडेला जुना बाजार सुरु ; वाहतूक झाली सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 06:56 PM2019-07-28T18:56:05+5:302019-07-28T18:57:24+5:30
एका लेनमध्ये जुना बाजार सुरु करण्यात आला असून दाेन लेन वाहतुकीसाठी खुल्या करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ येथील रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी सुटली आहे.
पुणे : दर बुधवारी आणि रविवारी शहरातील मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्यावर भरणाऱ्या जुना बाजार मुळे याठिकाणी माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत हाेती. त्यामुळे रस्त्यावर भरणारा बाजार बंद करण्याचा निर्णय पाेलिसांकडून घेण्यात आला हाेता. या निर्णयाविराेधात येथील व्यावसायिकांनी बुधवारी ठिय्या आंदाेलन केले हाेते. त्यावेळी जुना बाजाराच्या संदर्भात ताेडगा काढण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले हाेते. आज वाहतूकीसाठी दाेन लेन माेकळ्या साेडून रस्त्याच्या कडेला बाजार भरविण्यात आला. त्यामुळे वाहतूकीस कुठलाही अडथळा झाला नाही.
मंगळवार पेठेत भरणाऱ्या जुन्या बाजारास माेठा इतिहास आहे. पेशवेकाळापासून या भागात जुना बाजार भरविण्यात येत आहे. या बाजारात अनेक दुर्मिळ वस्तू मिळतात. त्याचबराेबर अनेक जुन्या वस्तू स्वस्त किमतीत मिळतात. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. हा बाजार दर बुधवारी आणि रविवारी रस्त्यावर भरते असताे. पुण्यात वाहनांची संख्या वाढल्याने या रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेण्यास सुरुवात झाली. बाजार भरत असलेल्या ठिकाणापासूनच जवळच चाैक असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत हाेत्या. त्यामुळे पाेलिसांनी रस्त्यावर भरणारा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी या ठिकाणी बाजार भरविण्यास पाेलिसांकडून मनाई करण्यात आली. त्यामुळे येथील सहाशे ते सातशे व्यावसायिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदाेलन केले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी बाजार भरणाऱ्या आतील बाजूची पाहणी केली. त्यावेळी तेथे अनेकांनी अतिक्रमण केल्याचे समाेर आले हाेते. तेथील अतिक्रमण काढून तसेच रस्त्याच्या बाजूला खालच्या बाजूस काही व्यावसायिकांचे स्थलांतर करण्याचा तसेच रस्त्यावच्या कडेला एका लेनमध्ये इतरांना व्यवसाय करु देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याप्रमाणे आज दाेन लेन वाहतूकीस साेडून रस्त्याच्या कडेला जुना बाजार भरविण्यात आला हाेता. याविषयी बाेलाताना फरासखाना पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक किशाेर नावंदे म्हणाले, बाजार भरण्याच्या दिवशी याठिकाणी वाहतूक काेंडीची माेठी समस्या निर्माण हाेत हाेती. त्यावर ताेडगा काढणे आवश्यक हाेते. आता दाेन लेन वाहतूकीस साेडून एका लेनमध्ये रस्त्याच्या कडेला येथील व्यवसायकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाहतूकीस दाेन लेन माेकळ्या झाल्याने येथील वाहतूक सुरळीत झाली आहे.