पुरातन पुण्याला पुन्हा नवी झळाळी
By admin | Published: March 20, 2017 04:41 AM2017-03-20T04:41:30+5:302017-03-20T04:41:30+5:30
महापालिकेच्या हेरिटेज सेलकडून पुण्यातील जुन्या वास्तूंचे नूतनीकरण करण्यात येत असून, ऐतिहासिक पुण्याचे वैभव पुन्हा
पुणे : महापालिकेच्या हेरिटेज सेलकडून पुण्यातील जुन्या वास्तूंचे नूतनीकरण करण्यात येत असून, ऐतिहासिक पुण्याचे वैभव पुन्हा झळाळून टाकणारी, जुन्या वास्तूंचे खास त्याच शैलीने नूतनीकरण करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. स्वतंत्र अंदाजपत्रक, विशेष अभियंते, स्थानिक नगरसेवकांचा सहभाग व पदाधिकाऱ्यांचे पाठबळ यातून गेल्या काही वर्षांत या कामाला चांगलीच गती मिळाली आहे.
नाना वाडा, विश्रामबागवाडा, कसबा गणपती, ओंकारेश्वर मंदिर, मंडई, नागेश्वर मंदिर अशी अनेक कामे त्यांनी त्या त्या वास्तूंच्या जुन्या शैलीतच उभी केली आहेत. आता लाल महाल, त्रिशुंड्या गणपती यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे करताना जुने वीटकाम असेल, तर त्या काळात भाजून तयार केल्या जातात तशा विटा ते तयार करून घेतात. चुन्यामध्ये केलेले बांधकाम असेल, तर त्यासाठी चुन्याची जुन्या काळात लावतात, तशी घाणी लावून चुना तयार केला जातो. लाकूडकाम असेल तर खास तसेच लाकूड आणून त्यावर कोरीव काम केले जाते. दगडी बांधकाम असेल, तर त्याच प्रकारचे दगड घडविले जातात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता अशा प्रकारचे काम करणाऱ्या ठेकेदारांचीही एक टीम तयार झाली आहे. सिमेंट काँक्रिटचे जंगल होत चाललेल्या पुण्यात या विभागाच्या कामांमुळे ठिकठिकाणी अशा आनंद देणाऱ्या वास्तू उभ्या राहिल्या आहेत.
अनेक शतकांचा इतिहास असलेल्या पुणे शहरात असंख्य धार्मिक स्थळे, जुन्या वास्तू आहेत. मात्र, काळाच्या ओघात त्यांची पडझड झाली होती. सन २००४ मध्ये महापालिकेने या वास्तूंचे नूतनीकरण करण्यासाठी म्हणून स्वतंत्रपणे हेरिटेज सेल स्थापन केला. त्यासाठी दर वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याचा निर्णय घेतला. या कक्षाचे प्रमुख म्हणून अभियंता शाम ढवळे यांची निवड झाली. त्यांनी अशा प्रकारच्या वास्तूंच्या नूतनीकरणासाठी डेक्कन महाविद्यालयात असलेला खास अभ्यासक्रम पूर्ण केला. शिवाजी लंके, सुनील मोहिते, वर्षा जाधव, पौर्णिमा गायकवाड या अभियंत्यांनाही अशा प्रकारच्या कामात रस होता. त्यांचीही या कक्षात नियुक्ती झाली. या टीमने मग स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, त्या त्या परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळवीत गेल्या काही वर्षांत अनेक वास्तूंचे जुन्या शैलीत नूतनीकरण केले आहे. त्यातून पुणे शहराला आता एक वेगळी ओळख मिळू लागली आहे.
दर वर्षी महापालिकेकडून या विभागासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद केली जाते.