जुन्या कालव्याचे ‘फेसाळलेले’ पाणी विहिरींमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 01:34 AM2016-01-22T01:34:56+5:302016-01-22T01:34:56+5:30

पुण्याचे घाण पाणी प्रक्रिया न करताच बेबी कॅनॉलमध्ये येत असून, हे पाणी कॅनॉललगतच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये जात आहे

In the old wells 'fluttered' water well! | जुन्या कालव्याचे ‘फेसाळलेले’ पाणी विहिरींमध्ये!

जुन्या कालव्याचे ‘फेसाळलेले’ पाणी विहिरींमध्ये!

Next

पुणे/ लोणी काळभोर : पुण्याचे घाण पाणी प्रक्रिया न करताच बेबी कॅनॉलमध्ये येत असून, हे पाणी कॅनॉललगतच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये जात आहे. परिणामी, येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी ताबडतोब आरो प्लँट उभारावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर व दशरथ काळभोर यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत केली असून, तसे निवेदन खासदार आढळराव-पाटील यांनाही दिले आहे.
पुणे महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जुना मुठा उजव्या कालव्यात सोडल्याने १९६५ नंतर म्हणजे तब्बल ५० वर्षांनंतर पाणी आल्यामुळे यापुढे कायमस्वरूपी बारमाही शेतीसिंचनासाठी पाणी मिळणार, यामुळे हवेलीतील बळीराजा आनंदला होता. परंतु या पाण्याने वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पाण्याला उग्र वास येत असून, पाणी जेथे आदळेल तेथे फेसाचा डोंगर तयार होत आहे. कालव्यालगतच्या विहिरी व बोअरवेलमधील पाण्याचा रंग काळसर-हिरवट होत असून, त्यालाही उग्र वास येत आहे.
बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैैठकीत जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर व दशरथ काळभोर यांनी कालव्यालगतच्या गावांना या पाण्याचा खूप त्रास होत आहे. लोक आजारी पडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने सदर गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लँट मंजूर करून द्यावा, अशी विनंती केली आहे. मुळा-मुठालगतच्या गावांना जसे शुद्धीकरण केंद्र बसविली आहेत, तशीच कालव्यालगतच्या गावांत बसवावे. तोपर्र्यंत येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
कालव्यात पाणी सोडण्यासाठी मुंढवा जॅक्वेलमध्ये ६०० अश्वशक्तीच्या ८ मोटारी बसवण्यात आल्या असून, सध्या त्यांतील दोन चालू करण्यात आलेल्या आहेत. आगामी वर्षात किलोमीटर ८३ ते १११ मधील कामे पूर्ण करून पुणे महापालिकेने प्रक्रिया केलेले सर्वच्या सर्व म्हणजे ६.५0 टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजित आहे. पाणी आले, मात्र सुमारे ६ ते ८ फूट उंचीचा फेस तयार होतो. जोराचा वारा आला की तो कालव्यालगत असलेल्या घरांत घुसतो. यामुळे येथील रहिवाशांना वेगळ्यांच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा केमिकलयुक्त फेसाचा डोंगर पाहिला की खरेच महानगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
आरोग्य केंद्रात आजअखेर कालव्यालगत राहणारा एकही रुग्ण आलेला नाही. आम्ही खबरदारी म्हणून ग्रामपंचायत लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या सर्व विहिरीचे पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मानवी आरोग्यास घातक घटक आढळून आले, तर त्याबाबत आमचे वरिष्ठ व संबंधित ग्रामपंचायतींना तत्काळ कळवून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येईल.
- डॉ. डी. जे. जाधव, आरोग्य अधिकारी, लोणी काळभोर

Web Title: In the old wells 'fluttered' water well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.