डोक्यात, छातीत कुऱ्हाडीने मारून ५० वर्षीय महिलेचा निर्घृन खून; बारामती तालुक्यातील हादरवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:23 PM2022-01-10T15:23:30+5:302022-01-10T15:39:39+5:30
अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला...
बारामती: शेळ्या अंगणात जाण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून कऱ्हावागज (ता.बारामती) येथील ५० वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि ९) दुपारी घडली. गंगूबाई तात्याराम मोरे असे या महिलेचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गंगूबाई यांच्या सून प्रमिला प्रमोद मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गेल्या अडीच वर्षांपूर्वी फियार्दीच्या शेजारी राहणारे भावकीतील किरण दादा मोरे यांची फियार्दीच्या सासू-सासऱ्यांबरोबर शेळ्या अंगणात जाण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. त्यावेळी भावकीतील लोकांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत भांडण मिटवले होते. त्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.
तेव्हापासून ही दोन्ही कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती. रविवारी(दि. ९) दुपारी दीड वाजता फिर्यार्दीने पती प्रमोद, सासू गंगूबाई यांच्यासमवेत जेवण केले. अर्ध्या तासाने पती प्रमोद हे बारामतीला कामावर निघून गेले. सासू गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेत गप्पा मारण्यासाठी घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या पत्राशेडजवळ गेल्या होत्या. अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला. त्याने तेथे जात गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला.
या घटनेत गंगूबाई या जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार पाहताच फिर्यादीने आरडाओरडा करीत धावत जात आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना बाजूला ढकलून देत गंगूबाई यांच्या छातीवर पुन्हा कुऱ्हाडीने वार केला. तुझ्या सासूचा कसा काटा काढला, तु पुढे ये, तुझा पण काटा काढतो असे धमकावत तो हातातील कुहाड घेत तो फियादीच्या अंगावरही धावून गेला.
त्यानंतर आरोपी पायातील चप्पल जागीच सोडून माळरानाच्या दिशेने पळून गेला. फिर्यादीने पतीला फोनवरून याची कल्पना दिली. गुन्हा घडल्यानंर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या कुटुंबाने यावेळी किरण याला पकडण्याची मागणी केले. जोपर्यंत आरोपीला पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर मृतदेह बारामतीत सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी देखील तपास करीत किरण मोरे याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी ही माहिती दिली.