जुन्या वाहनांना ‘जीपीएस’ची सक्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:37 PM2018-04-07T16:37:43+5:302018-04-07T16:37:43+5:30
केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये काही बदल करून प्रवासी वाहनांना जीपीएस यंत्रणा व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे : प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (जीपीएस) व आपत्कालीन बटन बसविण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे. दि. १ एप्रिलपूर्वी उत्पादित, विक्री व नोंदणी झालेल्या वाहनांना ही उपकरणे बसविण्याची सक्ती नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये काही बदल करून प्रवासी वाहनांना जीपीएस यंत्रणा व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलाची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. आरटीओकडून याबाबत परिपत्रक प्रसिध्द करून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामधून दुचाकी, रिक्षा ही वाहने वगळण्यात आली आहेत. मात्र, निर्णयाची अंमलबजावणी करण्यापुर्वी वाहन मालकांना संबंधित उपकरणे बसविण्याबाबत पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. या बदलाची अनेकांना माहितीही नाही. त्यामुळे अशापध्दतीने अचानक अंमलबजावणी करणे चुकीचे असल्याने ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती.या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना पत्र पाठवून दि. १ एप्रिलपुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही सक्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही वाहने संबंधित उपकरणांशिवाय योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तसेच नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत. दि. २ ते ५ एप्रिल या कालावधीत ज्या वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पूर्वनियोजित वेळ मिळाली होती. परंतु, त्यांची वाहन तपासणी झालेली नाही. अशा पुणे कार्यालयातील नोंदणीकृत वाहनधारकांना दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पुरंदर तालुक्यातील दिवे येथील ट्रॅकवर आणि पिंपरी चिंचवड कार्यालयातील नोंदणीकृत वाहनधारकांनी मोशी येथील ट्रॅकवर वाहने तपासणीसाठी हजर करावीत, असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.