ऑलिव्हर क्रॉफर्ड ठरला विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:31+5:302021-03-30T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड याने झेन खान याचा ६-३, ६-० असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्डने अमेरिकेच्या आठव्या मानांकित झेन खानचा पराभव केला. ऑलिव्हरने झेनचे आव्हान १ तास ८ मिनिटांत सहज मोडीत काढले. पहिल्या सेटमध्ये ऑलिव्हरने आक्रमक खेळ केला. दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये झेनची सर्व्हिस ब्रेक केली व आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या झेनने पुनरागमन करत ऑलिव्हरची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व ही आघाडी कमी केली. पण ऑलिव्हरने झेनला कमबॅकची संधी न देता स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट जिंकून विजेतेपदाकडे आगेकूच केली.
दुसऱ्या सेटमध्येदेखील झेनला अखेरपर्यंत लय गवसली नाही. याचाच फायदा घेत ऑलिव्हरने झेनची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व एकतर्फी पराभव करून विजेतेपद मिळवले. या वेळी ऑलिव्हर म्हणाला की, भारतात मी प्रथमच खेळत असून पुण्यातील वातावरण नक्कीच खेळण्यायोग्य होते. मी आता दिल्लीला आगामी स्पर्धा खेळण्यास जाणार आहे. कारकिर्दीमधील माझे हे तिसरे आयटीएफ विजेतेपद आहे. गेल्यावर्षी टेक्सास येथे येथे आणि पहिले विजेतेपद २०१८ मध्ये मिळविले होते.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक आणि १ लाख ५६ हजार पाचशे रुपये व १८ एटीपी गुण, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक आणि ९२ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे उपाध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शीतल अय्यर आदी या वेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम (मुख्य ड्रॉ) फेरी : पुरुष :
ऑलिव्हर क्रॉफर्ड, अमेरिका (४), वि.वि.झेन खान, अमेरिका (८) ६-३, ६-०.