आॅलिम्पिक पदके आणि शालेय शिक्षण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:14+5:302021-08-19T04:13:14+5:30
टोकियोमध्ये नुकत्याच आॅलिम्पिक स्पर्धा झाल्या. प्रत्येक राष्ट्राच्या सन्मान आणि गौरवाचे मानचिन्ह असणाऱ्या या स्पर्धा विश्व सन्मानाचे प्रतीक समजल्या जातात. ...
टोकियोमध्ये नुकत्याच आॅलिम्पिक स्पर्धा झाल्या. प्रत्येक राष्ट्राच्या सन्मान आणि गौरवाचे मानचिन्ह असणाऱ्या या स्पर्धा विश्व सन्मानाचे प्रतीक समजल्या जातात. प्रत्येक राष्ट्राला आत्मसन्मान असतो. त्या देशातील नागरिकांना हा राष्ट्राचा आत्मसन्मान प्राणापेक्षाही प्रिय असतो. म्हणूनच टोकियो आॅलिम्पिकमध्ये नीरच चोप्राने सुवर्णपदकावर नाव मुद्रांकित केले आणि अवघा भारत हर्षोत्फुल्ल झाला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी नीरज चोप्रावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नीरज चोप्रा याच्याशी संवाद साधून राज्याच्या वतीने सन्मान करण्याचा संकल्पही व्यक्त केला आहे. भारताने आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्यपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. २०२१ मध्ये लंडन आॅलिम्पिकमध्ये दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली होती. टोकियो आॅलिम्पिकमध्ये भालाफेकीत नीरज चोप्राने सुवर्ण, भारोत्तलक मीराबाई चानू, कुस्तीगीर रवीकुमार दहिया यांनी रौप्य, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, कुस्तीगीर बजरंग पुनिया, बाॅक्सर लवलिना बोरगोहेन, भारतीय पुरुष हाॅकी संघ यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत अमेरिकेने ३९ सुवर्णांसह ११३ पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले. चीनने ३२ सुवर्णांसह ८८ पदके जिंकून दुसरे स्थान पटकावले. रशिया २० सुवर्णपदकांसह ७१ पदके जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
आॅलिम्पिक स्पर्धा विश्वातील राष्ट्रांच्या शौर्य, साहस आणि पराक्रमाच्या विक्रमाची यशोगाथा आभाळाच्या भाळावर मुद्रांकित करून आत्मगौरवाची कीर्तीपताका अभिमानाने फडकवत असतात. कोणतेही राष्ट्र विजयाच्या ऊर्जेवर प्रगतीचे अविरत आणि अखंड मार्गक्रमण करीत असते. क्रीडा हे स्वाभिमान आणि सन्मानाचे प्रतीक असते. खेलो इंडिया खेलोसारख्या उपक्रमांमुळे आॅलिम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केली. आॅलिम्पिक पदक विजेत्यांमध्ये आघाडीवर असलेल्या देशांमध्ये क्रीडा हा भविष्याचा अर्थात करिअरचा महत्त्वाचा विषय आहे. शालेय वयातच त्यांची सुप्त क्रीडा प्रतिभा घर आणि शाळांमधून निश्चत केली जाते. प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन क्रीडा प्रतिभा जाणीवपूर्वक संगोपली जाते. पूरक उपक्रम, नेमका सराव, उत्तम प्रशिक्षक आणि आहाराचे काटेकोर नियमन आणि नियोजन केले जाते. शाळांमधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रतिभेचा असा सन्मान केला जातो. आपल्याकडे ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी शाळा सुटल्यावर खेळत असतील तर आईवडील त्याला प्रेरणा, प्रोत्साहन देण्याऐवजी ‘खेळल्याने पोट भरत नाही रे अभ्यास कर’ असा घोष लावतात. शालेय वयातच कुटुंबात क्रीडा प्रतिभा अशी अव्हेरली अथवा अपमानीत केली जाते. त्यामुळे खळखळणारा उत्साह हळूहळू संपुष्टात येतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे, महाराष्ट्रा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ज्या विद्यार्थ्यांनी राज्य अथवा राष्ट्र स्तरापर्यंत क्रीडा नैपुण्यात झेप घेतलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेसाठी गुणांची प्रतिपूर्ती केली जाते. एरवी घरांतून क्रीडा प्रतिभेचा गौरव करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी पालकांचे आणि एकूणच समाजाचे प्रबोधन शाळा, स्वयंसेवी संस्था आणि शासनाने करणे अगत्याचे आहे.
शालेय स्तरावर विशेषत: माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात पर्यायाने पाठ्यपुस्तकांमधून विश्वस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त केलेल्या विश्वविक्रम प्रस्थापीत केलेल्या खेळाडूंचे चरित्र अथवा त्यांचे असाधरण प्रयास शब्दांकित करून त्यांची कामगिरी विद्यार्थ्यांपुढे सादर करावी. प्रेरणेचे दीप नैराश्य पसरलेल्या मनात नवी आशा पल्लवीत करतात. शाळांमध्ये क्रीडा शिक्षकही नियुक्त केलेले असतात. पण त्यांना प्रेरित करून क्रीडांगणावर नैपुण्य प्रस्थापित करण्यासाठी वातावरण निर्माण केले जात नाही. शारीरिक शिक्षणाच्या तासांत मागे राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. क्रीडा प्रतिभा आणि नैपुण्याला सन्मानाच्या आसनावर विराजित करायला शिकू म्हणजे भविष्यातील आॅलिम्पिकमध्ये आपल्याला अव्वल दहा देशांमध्ये तरी स्थान मिळेल. भारतीय समाजव्यवस्थेत खेळ ही अनुत्पादक समजली जाणारी बाब आहे. ही धारणा बदलणे आवश्यक आहे. ‘पोरखेळ करणे, आयुष्याचा खेळखंडोबा करणे’ यांसारख्या वाक्यप्रकारांमधून खेळांचे दुय्यमत्त्व आधोरेखित केले जाते. शाळांमधून विशेष प्रोत्साहन देऊन क्रीडा नैपुण्य अविरत सन्मानित करणे, तालुका, जिल्हास्तरांवर निवासासह क्रीडांगणे विकसीत करणे, क्रीडा शिक्षकांना उच्च दर्जा प्रशिक्षण देणे, विद्यार्थी आणि युवकांमधील स्फूर्ती, चेतना आणि ऊर्जेला संधी आणि सन्मान दिल्यास आपणही विक्रम प्रस्थापित करू शकू हे निर्विवाद सत्या आहे.
- - डाॅ. गोविंद नांदेडे, पूर्व शिक्षण संचालक, पुणे