ओम गं गणपतये नम...! दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 01:02 PM2024-09-08T13:02:49+5:302024-09-08T13:02:57+5:30

गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता

Om gan ganpataye namah ganpti Atharvashirsha chanting of 35 thousand women in front of dagdusheth Ganapati | ओम गं गणपतये नम...! दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

ओम गं गणपतये नम...! दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे : ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत  महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.
 
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्रा.गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले. 

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे ३९ वे वर्ष होते.

Web Title: Om gan ganpataye namah ganpti Atharvashirsha chanting of 35 thousand women in front of dagdusheth Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.