OMG! ... तर पुण्यातील अनेक पेट्रोल पंप ठेवावे लागणार बंद; 'हे' आहे त्यामागचे खास कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:28 PM2021-02-17T14:28:36+5:302021-02-17T14:30:05+5:30
साधे पेट्रोलचा दर १०० रुपये झाल्यास एका कंपनीच्या जवळपास सर्वच पेट्रोल पंपाना बंद ठेवण्याची पाळी येणार आहे.
विवेक भुसे-
पुणे : पेट्रोलची दरवाढ गेल्या काही दिवसांपासून वेगाने शंभरीकडे जात आहे. प्रीमियम पेट्रोलचे तर आताच शंभरापर्यंत पोहचले आहेत. प्रीमियम पेट्रोलचे दर शंभरावर पोहचल्यावर पुण्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये १०० आकडा येऊ शकत नाही. त्यामुळे ते युनिट पेट्रोल पंपचालकांना बंद ठेवावे लागणार आहे. साधे पेट्रोलचा दर १०० रुपये झाल्यास एका कंपनीच्या जवळपास सर्वच पेट्रोल पंपाना बंद ठेवण्याची पाळी येणार आहे.
पेट्रोलचे दर सध्या दररोज बदल आहेत. त्यानुसार सकाळी पेट्रोल पंप सुरू करताना तेथील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणाऱ्या सर्व युनिटचे कॅलिब्रेशन करून नवीन दर त्यात फीड करावे लागतात. पेट्रोलचा दर जर शंभर रुपये झाला तर तो दर या मशिनवर फीड करता येईल का याचे प्रात्याक्षिक एका पेट्रोल पंपावर घेण्यात आले. त्यात जे युनिट डिजिटल आहे. त्या ठिकाणी १०० आकडा फीड करता येतो. मात्र, ज्या पेट्रोल पंपावर टॅट सुनो ही प्रणाली वापरत आहेत. त्या पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये १०० आकडा टाईपच करता येत नाही. त्यामुळे या युनिटवर १०० आकडा येत नसल्याने त्यावरून पेट्रोल वितरण करता येणार नसल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात जवळपास ५५० पेट्रोल पंप असून अनेक ठिकाणी टॅट सुनो ही प्रणाली वापरण्यात येत आहे. त्या ठिकाणी शंभर आकडा युनिटवर येत नसल्याने पेट्रोल पंपचालकांना तशी युनिट बंद ठेवावी लागणार आहे. आज पेट्रोलचा दर ९५.३९ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचवेळी पॉवर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.०७ रुपये झाला आहे. पेट्रोलचा दर साधारण दररोज २५ ते ३० पैशांनी वाढत आहे. तो असाच वाढत राहिला तर, पॉवर पेट्रोलचा दर पुढील ३ ते ४ दिवसांत शंभर रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात परभणी, नांदेड येथे तर तो आताच शंभरावर पोहचला आहे. पेट्रोलचा दर शंभर रुपये झाला तर अनेक पेट्रोल पंपावर ही समस्या निर्माण होणार आहे