अबब! पुणे महापालिकेच्या मोकळ्या जागांचे मूल्य २० हजार कोटींपेक्षा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 12:52 PM2020-10-22T12:52:31+5:302020-10-22T12:56:11+5:30
कोरोनामुळे कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.
लक्ष्मण मोरे -
पुणे : घटलेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. उत्पन्न वाढीसाठी पालिकेकडून अभय योजना आणण्यात आली असून सदनिका व गाळे विक्री केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मालमत्ता व्यवस्थापन विभागाने पालिकेच्या मालकीच्या १३ प्रकारच्या मालमत्तांच्या 'व्हॅल्यूएशन'चे काम सुरू केले आहे. त्यापैकी मोकळ्या जागांचे आतापर्यंत १८ हजार कोटींचे मूल्यमापन करण्यात आले आहे. आणखीही मोकळ्या जागा शिल्लक असून हा आकडा वीस हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या मालकीच्या भूखंडांसह अॅमेनिटी स्पेस, मोकळ्या जागा, स्मशानभूमी, उद्याने, रुग्णालये, इमारती, सदनिका, रंगभूमी, नाट्यगृहे, मंडई, अग्निशामक केंद्र, क्रीडा संकुले आदी १३ प्रकारच्या मालमत्तांचे व्हॅल्यूएशन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याची सुरुवात मोकळ्या जागांपासून करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या जागांचे मुल्यमापन करण्यात आले आहे त्यांचे एकूण मुल्य १८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. आणखी ब-याच मोकळ्या जागांचे मुल्यमापन करण्याचे काम सुरु आहे.
पालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवर अतिक्रमणे होत असल्याचे दिसत आहे. बेकायदेशीरपणे टाकलेले ‘ताबे’ काढण्यासाठी पालिकेला कायदेशीर लढाई लढावी लागते. तसेच पालिकेच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होतो. मालमत्तांचा गैरवापर होऊ नये याकरिता तसेच या जागांचा व्यावसायिक वापर वाढवित पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.
केवळ मोकळ्या जागांचे मुल्य १८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. आणखी 12 प्रकारच्या मालमत्तांचे मुल्यमापन शिल्लक आहे. या सर्व मालमत्तांचे मुल्यमापन झाल्यानंतर हा आकडा बाजारभावाप्रमाणे ५० हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
====
मालमत्तांचे पॉलिगन मॅपिंग
पालिकेच्या मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्यात आले असून आता त्याचे पॉलिगन मॅपिंग सुरु करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या या मॅपिंगद्वारे उद्यानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरीत मालमत्तांचे सर्वेक्षण येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
====
या सर्वेक्षणामुळे पालिकेच्या मालमत्तांवर झालेली अतिक्रमणे निदर्शनास येणार असून या जागा मोकळ्या केल्या जाणार आहे. खुला जागांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या सर्व मिळकती गुगल मॅपवर टाकण्यात येणार आहेत. मालमत्तांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे कामही सुरु आहे.
====
पालिकेच्या मालमत्ता
इमारती ६३
अॅमिनिटी स्पेस ३१
भूखंड १८
प्राथमिक शाळा २९३
उद्याने २०१
रुग्णालये ७५
सांडपाणी प्रक्रिया केंद्र २४
सांस्कृतिक केंद्र १४
क्षेत्रीय कार्यालये १६
अग्निशामक केंद्र १४
क्रीडा संकुल ५२
मंडई २५
स्मशानभूमी ८१
व्यावसायिक गाळे ३३४
भूमी १६३५
सदनिका २९४७