Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:35 PM2021-12-08T13:35:30+5:302021-12-08T13:35:50+5:30
शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे : रविवारी शहरात ओमायक्रॉनबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनासह सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली. त्यानंतर बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या संपर्कातील २५ लोकांचा अहवाल सोमवारी, तर आणखी १७ जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला.
एप्रिल-मेनंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली. त्यानंतर गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या बरीचशी आटोक्यात आली. अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी ओमायक्रॉनच्या शिरकावामुळे संपूर्ण यंत्रणेचे धाबे दणाणले. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग ‘डेल्टा व्हेरिएंट’पेक्षा पाचपट असल्याने नव्या व्हेरिएंटच्या रूपाने तिसरी लाट येईल का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे.
ओमायक्रॉनबाधित व्यक्तीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले असून, सध्या त्याला कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे. २९ नोव्हेंबरला थोडासा ताप जाणवल्याने आणि १८ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान फिनलंड येथे प्रवास करून आल्याने रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा घशातील द्रवाचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आला. सध्या दररोज रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. किमान १० दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करणात आला आहे.
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे आवर्जून पालन करावे
“ओमायक्रॉनबाधित रुग्णाबरोबर प्रवास केलेल्या व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, सोसायटीतील सदस्य, कामवाली, आदींची तपासणी करण्यात आली. रुग्णाच्या संपर्कातील ४३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ओमायक्रॉनचा शहरात शिरकाव झाला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग अशा कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे आवर्जून पालन करावे असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे.''