अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 01:35 PM2024-08-11T13:35:17+5:302024-08-11T13:35:47+5:30
पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही मिरवणूक काढणाऱ्यांनी नकार दिला
पुणे: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव साजरा करताना मोठमोठ्या आवाजात डीजे साउंडचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव २०२४ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव ढावरे, राहुल खुडे आणि डीजे चालकावर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मिरवणुकीतील डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल इतका होता.
याबाबत पोलिस अंमलदार सागर काळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट पोलिसांनी वेळोवेळी बैठका घेऊन उत्सवामध्ये साउंड बॉक्स मर्यादित ठेवणे व आवाज मर्यादित ठेवणे अशा सूचना मंडळांना दिल्या होत्या. सदाशिव ढावरे अध्यक्ष असलेल्या मिरवणुकीत डीजे साउंडचा वापर करून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जात होती. पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी त्यास नकार दिला. सांगूनही आवाज कमी करत नसल्याने पोलिसांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नॉइज लेव्हल मीटर मशीनच्या साहाय्याने डीजेच्या दणदणाटाची ध्वनितीव्रता मोजली. ती तब्बल १०८.३ डेसिबल इतकी होती. ध्वनिप्रदूषण मर्यादा ओलांडल्याने या मंडळाचे अध्यक्ष व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील या करत आहेत.