...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 01:39 PM2022-08-07T13:39:20+5:302022-08-07T13:40:07+5:30

पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात होते

On that day these 6 people were not present at the place of incident Shiv Sena office bearers in judicial custody on uday samant attack case | ...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

googlenewsNext

पुणे: माजी मंत्री व शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने शनिवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या पदाधिकाऱ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा आदेश दिला.

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय हरिश्चंद्र मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव नारायण थोरात, राजेश बाळासाहेब पळसकर, संभाजी हनुमंत थोरवे, सूरज नथुराम लोखंडे आणि चंदन गजाभाऊ साळुंके अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सामंत यांच्या वाहनचालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची गेल्या मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली होती. या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. पोलिसांना तपास करण्यासाठी योग्य ती मुदत देण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींपैकी कोणीही त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणात रुपेश अनंतराव पवार याला न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तक्रार अर्जात पवार याचे नाव शेवटी समाविष्ट करण्यात आले आहे. आरोपीवर चुकीची कलमे लावण्यात आली आहेत. आरोपीला चुकीच्या पद्धतीने केसमध्ये गोवण्यात आले आहे. त्याच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद ॲड. ॠषीकेश सुभेदार आणि ॲड. दिनेश आढाव यांनी केला. तो ग्राह्य धरीत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए.एस वाघमारे यांनी रुपेश पवार याला अंतरिम अटकपूर्व जामीन दिला.

Web Title: On that day these 6 people were not present at the place of incident Shiv Sena office bearers in judicial custody on uday samant attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.