दिवाळीच्या तोंडावर चितळे बंधूंच्या मिठाई दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शटर उचकटून दीड लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:03 PM2024-10-28T13:03:08+5:302024-10-28T13:03:56+5:30
दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून तोंड झाकल्याने त्याचा चेहरा दिसून येत नाही, पोलिसांची माहिती
पुणे: दिवाळी अगदी तोंडावर आल्याने मिठाईच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरट्याने औंध, बाणेर रोडवरील एका मिठाईच्या दुकानाला लक्ष्य केले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील १ लाख ४१ हजार रुपये आणि दोन चांदीचे शिक्के घेऊन पोबारा केला. रविवारी पहाटे ४:०० ते ५:००च्या सुमारास औंध - बाणेर रोडवरील दुकानात ही घटना घडली.
चितळे बंधू मिठाईवाले यांचे औंध - बाणेर रोडवरील दुकान रविवारी (दि. २७) सकाळी उघडण्यासाठी कामगार आले. तेव्हा त्यांना शटर उचकटलेले दिसून आले. चोरट्याने शटर उचकटून आत प्रवेश केला. टेबलाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील १ लाख ४१ हजार रुपये आणि २५० ग्रॅमचे २ चांदीचे शिक्के चोरून नेले. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून, पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. चोरट्याने तोंड झाकून घेतले असल्याने त्याचा चेहरा दिसून येत नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले.
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने दुकानात फराळ, मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे. त्यात शनिवार, रविवार बँका बंद असल्याने दिवसभरात जमा झालेली रोकड दुकानात ठेवलेली होती. ही संधी साधून चोरट्याने डाव साधला. पुढील तपास पोलिस करत आहेत.