ST Bus: नवरात्री निमित्त एसटीतर्फे साडेतीन शक्तीपीठांसाठी विशेष बस
By नितीश गोवंडे | Published: September 21, 2022 08:10 PM2022-09-21T20:10:53+5:302022-09-21T20:15:02+5:30
भाविकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले ...
पुणे :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठांसाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. २७ आणि ३० सप्टेंबर रोजी तीन बस रवाना होणार असून, भाविकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड येथून २७ आणि ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता एसटी (साधी) निघणार आहे. ही बस पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज मार्गे कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तश्रृंगी करून पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे येईल. या प्रवासावेळी तुळजापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगीगड अशी तीन मुक्कामे असणार आहेत. यासाठी २ हजार ६९५ रुपये भाडे असणार आहे.
शिवाजीनगर येथून ३० सप्टेंबर कोजी सकाळी ७ वाजता एसटी (शयनयान) निघणार आहे. ही बस शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज मार्गे कोल्हापूर, तुळजापूर, माहुरगड, सप्तश्रृंगी या मार्गाने पुन्हा शिवाजीनगरला येईल. या प्रवासावेळी तुळजापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगीगड अशी तीन मुक्कामे असणार आहेत. यासाठी ३ हजार ६४५ रुपये भाडे असणार आहे.
या विशेष साडेतीन शक्तीपीठांसाठी नियोजित बसचे आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळासह इतर संकेतस्थळांवरूनही करता येणार आहे.