Shravan Somvar: भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त सर्वत्र 'हर हर महादेव' जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 05:10 PM2022-08-01T17:10:19+5:302022-08-01T17:10:33+5:30
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी सहावे ज्योतीर्लिंग
भीमाशंकर : 'हर हर महादेव' चा जयघोष अन् भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी नागरिकांनी महादेवाचे दर्शन घेतले. भीमाशंकरला सुमारे दिड किलोमीटर दर्शन रांग लागली होती. अधुनमधून पडणा-या पावसाच्या सरी व दाट धुक्यात भाविक दर्शन रांगेत तासंतास उभे राहून दर्शन घेत होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे वाहतुककोंडी व इतर अडचणी भाविकांना भेडसावल्या नाहीत.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी सहावे ज्योतीर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्या पवित्र शिवलींगाचे दर्शन घेण्यासाठी भविकांची मोठी गर्दी होते. शनिवार, रविवार व सोमवारी सलग तीन दिवस सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांपासून दर्शन रांग जुन्या एमटिडीसी पर्यत जात आहे. हे अंतर सुमारे दिड किलोमीटरचे असून दर्शन रांगेत उभे राहिलेल्या भाविकांचे दोन ते अडिच तासात दर्शन होत आहे.
तसेच देवस्थानने मुखदर्शनाची व व्हिआयपी पास व्दारे दर्शनासाठी व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्याने जास्त लोक मुखदर्शन घेऊन परतत आहेत.
यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच वाहनतळे, बसस्थानक, पायऱ्या, मंदिराचा परिसर, गाभा-यात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या उत्तम नियोजनामूळे रस्ता छोटा असतानाही वहातुक कोंडी झाली नाही. वाहतनळ व बसस्थानक येथे एसटि मिनीबस मध्ये बसण्यासाठी पोलिसांनी व एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी चांगले नियोजन केले आहे. त्यामुळे एकच गर्दी होताना दिसली नाही. तसेच बजरंग दलाचे कार्यकर्तेही पोलिसांना व भाविकांना मदत करत होते.