पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवर नगर, नाशिकच्या तुलनेत पुण्यालाच झुकते माप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:04 PM2023-05-19T12:04:21+5:302023-05-19T12:05:02+5:30
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदस्यांच्या यादीतून ही बाब समोर आली आहे....
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवविज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन आणि आंतर विद्याशाखीय शाखांमधील ६१ अभ्यासमंडळांवर अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यात नगर व नाशिकच्या तुलनेत पुण्यालाच झुकते माप देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदस्यांच्या यादीतून ही बाब समोर आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम कलम ४० (२) अन्वये किमान दहा वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या अध्यापकाचे नामनिर्देशन करण्यात येते. एका विषयाच्या अभ्यास मंडळात संबंधित विषयातील विद्यापीठाच्या विभागातील पूर्णवेळ अध्यापकांमधून एक तर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील दोन अध्यापक आणि विभागप्रमुख नसलेले तीन अध्यापक अशा एकूण सहा जणांचा समावेश असतो. त्यानुसार मानवविज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन आणि आंतर विद्याशाखीय शाखांमधील ६१ अभ्यासमंडळांवर अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सायन्स विद्या शाखेमध्ये १६८ अभ्यास मंडळाच्या जागा होत्या. त्यातील १५२ जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, १६ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये पुण्याला १०३ तर नगर, नाशिकला फक्त ४९ जागा मिळाल्या. यातील काही अध्यापक असे आहेत, ज्यांच्या महाविद्यालयांना स्वायत्तता मिळालेली आहे. तरीही त्यांना अभ्यास मंडळावर नियुक्त करण्यात आले आहे. स्वायत्त महाविद्यालयांचे काम अधिक असल्याने ते फारसा वेळ देऊ शकत नाहीत. तरीही त्यांची अभ्यासमंडळावर वर्णी लावण्यात आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
मानव विज्ञान विद्या शाखेत अभ्यास मंडळाच्या एकूण १२० जागा होत्या. त्यातील ९५ जागा भरल्या असून ३५ रिक्त आहेत. यात पुणे शहर व जिल्हा मिळून ४८ तर नगर आणि नाशिकला केवळ ४७ जागा दिल्या आहेत. वाणिज्य विद्या शाखेत १८० जागांपैकी १६२ जागा भरल्या असून १८ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यातील पुणे शहराला १०० जागा दिल्या असून, नगर, नाशिकला ६१ जागा देण्यात आल्या आहेत.
नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी अभ्यासक्रमांचे पुनर्गठन करावे लागणार आहे. या स्थितीत जर अशा सदस्यांची अभ्यास मंडळे होणार असतील तर काय करणार ? अभ्यास मंडळाच्या नियुक्तीबाबत लॉबिंग झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
महाविद्यालयात सायन्स विभाग नसलेलाच प्राचार्य भौतिकशास्त्राच्या अभ्यास मंडळावर
संजय चाकणे हे टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य होते. प्रा. चाकणे यांच्या महाविद्यालयात सायन्स (फिजिक्स, केमिट्री, बायोलॉजी) असा विभागच नाही. या महाविद्यालयात सायन्स अंतर्गत कॉॅम्प्युटर सायन्स शिकविले जाते, याकडे एका अधिसभा सदस्याने लक्ष वेधले आहे. तरीही फिजिक्सच्या अभ्यास मंडळावर त्यांची नियुक्ती कशी केली गेली ? हे नैतिकतेमध्ये बसते का ? असे सांगत विद्यापीठात त्यांच्यावर टीका केली जात आहे.
माझी नियुक्ती विद्यापीठाच्या उपकुलगुरुंनी केली आहे. मी यावर काहीही बोलू शकत नाही. याबाबत त्यांच्याशी बोलावे.
- संजय चाकणे, प्राचार्य टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय