‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी?

By श्रीकिशन काळे | Published: July 22, 2024 07:48 PM2024-07-22T19:48:10+5:302024-07-22T19:50:01+5:30

कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी कोणतेही शब्द ओढून-ताणून बसविल्याची टीका साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली

on what basis has the poem in the first standard Balbharti book been selected? | ‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी?

‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी?

पुणे: बालभारतीची पुस्तके ही तावून-सुलाखून तज्ज्ञ मंडळीची समिती नेमून निवडले जाते. परंतु, पहिलीच्या पुस्तकामध्ये एका कवयित्रीच्या कवितेने सोमवारी दिवसभर चर्चा चर्वण झाले आणि त्या कवितेवर सोशल मीडियावर चांगलाच खल पहायला मिळाला. कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी कोणतेही शब्द ओढून-ताणून बसविल्याची टीका साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली. त्या कवितेला अजिबात साहित्यमुल्य नसल्याचे बोलले गेले आणि बालभारतीमध्ये तिची निवड कशी केली ? यावर शंका उपस्थित करण्यात आली.

बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकामध्ये ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता आहे. त्या कवितेमध्ये यमक जुळवताना अनेक परभाषेतील शब्द वापरण्यात आले. त्यात इंग्रजी आणि हिंदी शब्द आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, इतर भाषेतील शब्द वापरले तर काही हरकत नाही. पण कवितेमध्ये यमक जुळविण्यासाठी जे काही केले आहे, त्यामुळे कवितेचे साहित्यमुल्यच नष्ट झालेले आहे. मुळात पहिलीच्या मुलांना अशाप्रकारची कविता देऊन त्यांच्यासमोर आपण नक्की कोणते साहित्य देत आहोत ? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

कवितेमध्ये अक्कल हा शब्द वापरण्याची शक्कल कवयित्रीने केली आहे. त्याची कीव वाटत असल्याची प्रतिक्रिया एका वाचकाने व्यक्त केली आहे. तर एक शिक्षिका म्हणते, जोडजाड केलेल्या कविता शिकवताना फार त्रास होतो. सहज सोपे ओघवते यमक असलेल्या ओळी शिकवताना सोप्या जातात आणि त्या मुलांच्या लक्षात राहतात.’’ खरंतर कवितेमध्ये यमक जुळविण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलाच ‘शोर’ झाल्याचेही एका वाचकाने ‘कोटी’ केली आहे.

फेसबुकवर ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’, या फेसबुक ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी सोमवारी ही कविता पोस्ट केली. त्यानंतर ती प्रचंड व्हायरल झाली. साहित्य विश्वात आणि सोशल मीडियावर या कवितेवरून ‘पाऊस’ पडला. निवड समितीने अशी कविता निवडलीच कशी ? असाच सवाल सर्वत्र केला जात आहे.

बालसाहित्य म्हणून ही कविता अत्यंत सुमार दर्जाची आहे. बालभारतीच्या पुस्तकात तिचा समावेश झाला ही शोकांतिकाच आहे. कविता निवडताना त्यासाठी समिती असते. परंतु, अशी कविता ज्यामध्ये केवळ यमक जुळविण्यासाठी प्रयत्न केला आहे. चांगल्या बालकवितांची वानवा नाहीय. पूर्वीच्या कवींनी अतिशय सुंदर कविता केलेल्या आहेत. ज्या लहान मुलांच्या लक्षात राहतात. त्या तुलनेत ही कविता अत्यंत कुठेच बसत नाही. -माधव राजगुरू, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था (माजी संचालक, बालभारती)

लहान मुलांना कविता ऐकताना ती एका तालात असली की, त्यांच्या लक्षात राहते. त्याचा विचार करून बालभारतीमध्ये कविता समाविष्ट केल्या जातात. खरंतर ही जी कविता आहे, त्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. इंग्रजी शब्द आहेत, ते आजच्या मुलांना दैनंदिन जीवनात वापरता येणारे आहेत. त्यावर टीका होत असेल, तर ते अयोग्य आहे. -कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

तिसरी असताना लिहिलेली कविता !

ज्या कवितेमुळे सोमवारी दिवसभर हंगामा झाला, ती ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता कवयित्रीने स्वत: तिसरीत असताना लिहिली होती. वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती, वाद्यांची माहिती आणि कवीचं वय या निकषांवर ही कविता शैक्षणिक समितीने निवडली असल्याचे खुद्द कवयित्रीनेच सोशल मीडियावर यापूर्वी जाहीर केलेले आहे.

Web Title: on what basis has the poem in the first standard Balbharti book been selected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.