येरवडा कारागृहात पुन्हा राडा; एकाच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 02:52 PM2019-07-03T14:52:37+5:302019-07-03T15:04:53+5:30
येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून तिघा जणांनी हिंदु सेनेचा समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर खिळ्याने वार करुन जखमी केले होते़.
पुणे : येरवडा कारागृहात मंगळवारच्या घटनेनंतर आज पुन्हा एकदा राडा झाला असून पाच ते सहा जणांनी महंमद जबाल नादाफ (वय ३५) कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़. नादाफ याची प्रकृती गंभीर आहे़ त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़.
येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून तिघा जणांनी हिंदु सेनेचा समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर खिळ्याने वार करुन जखमी केले होते़. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडल्यानंतर तुषार हंबीर याच्या साथीदारांनी शाहरुख खान याच्यावर हल्ला केला़. त्याला सोडविण्यासाठी गेलेले तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली होती़. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे़.
या घटनेनंतर आज सकाळी महंमद जबाल नादाफ याच्यावर पाच ते सहा जणांनी महंमद याला बेदम मारहाण करुन डोक्यात दगड घातला़ रक्तबंबाळ अवस्थेत तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे़.
येरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून कैद्यांमध्ये सतत हाणामाऱ्या होत असून नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़. मात्र, त्यावर शासनाने जुजबी उत्तर दिले होते़.
लागोपाठ दोन घटनांमुळे येरवडा कारागृहात खळबळ माजली असून सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद करुन ठेवले आहेत.
कोल्हापूरमध्येही कैद्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज तुरुंग महानिरीक्षक सुनिल रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. आज सायंकाळी येरवड्यातील वाढत्या हाणामारीच्या घटनांवर आपण बैठक घेणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले. हिंदु राष्ट्र सेनेचा कट्टर समर्थक तुषार नामदेव हंबीर याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर त्याच्या साथीदारांनी तुरुंगात गस्त घालणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत मारहाण केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ न्यायालयीन बंदींवर गुन्हा दाखल केला आहे.
राहुल बाळासाहेब तुपे, अक्षय ऊर्फ पप्पु मच्छिंद्र हाके, यशवंत ऊर्फ अक्षय राजेंद्र सूर्यवंशी, पृथ्वीराज राजेंद्र सूर्यवंशी, गौरव प्रदीप जाधव, राहुल बाळासाहेब पानसरे, अक्षय आनंदा चौधरी, अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव, अक्षय लक्ष्मण इंगुळकर, संजय रामचंद्र औताडे, अनिल तुकाराम सोमवंशी, शिवशंकर सस्तानंद शर्मा, प्रविण सुनिल सुतार, निखिल देवानंद पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपींना विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहेत.
याप्रकरणी तुरुंग अधिकारी संदीप रतन एकशिंगे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक २ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शाहरुख शेख, सलीम शेख आणि अमन अन्सारी यांनी हिंदु राष्ट्र सेनेचा समर्थक तुषार हंबीर याच्यावर मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता दगड व लोखंडी खिळ्याने गळ्यावर, मानेवर, हातावर मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती तुरुंगातील इतर आरोपींना समजली. त्यामुळे सर्कल क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आलेले हंबीरचे साथीदार हे संतापले होते. संदीप एकशिंगे हे सकाळी दहा वाजता सर्कल २ मध्ये गस्त घालत असताना हे आरोपी शाहरुख अस्लम खान याला मारहाण करीत होते. हे पाहून एकशिंगे हे त्याला सोडवायला गेले. तेव्हा त्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताला, तोंडाला मुका मार लागला आहे.
येरवडा पोलिसांनी या १४ जणांविरुद्ध दंगल माजविणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.