महापालिकेच्या पथ व पाणी पुरवठा विभागाच्या समन्वयाअभावी रस्त्यांची ‘खोदाई पे खोदाई ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:49 PM2019-02-02T12:49:42+5:302019-02-02T12:57:27+5:30
नगरसेवकांनी हे आर्थिक वर्ष संपण्याआधी स यादीमधील निधी संपविण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे.
पुणे : पथ आणि पाणी पुरवठा विभागामधील समन्वयाअभावी शहरामध्ये तयार करण्यात येत असलेले रस्ते पुन्हा खोदावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. २४ तास पाणी पुरवठा योजनेचे या रस्त्यांवर काम करण्याचे प्रस्ताव पथ विभागाकडे पडून आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी डांबरी तसेच सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरु आहे; तेथे २४ तास पाणी पुरवठ्याची जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम करावे लागणार आहे.
संपुर्ण महापालिका क्षेत्रातील नागरिकांना समान पाणी पुरवठा व्हावा, तसेच पाणी गळती थांबविण्याकरिता २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. तसेच ५० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी मीटरही बसविण्यात आलेले आहेत. शहराला समान पाणी देण्याकरिता पाणी पुरवठा विभागाकडून १८०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा विभागाने ३५० किलोमीटर लांबीचे पाईप घेतले आहेत. त्यासाठी ३५० किलोमीटरची खोदाई करण्यास परवानगी मागणारे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने पथ विभागाकडे दिले आहेत. मात्र, अवघ्या ५६ किमी लांबीच्या खोदाईस परवानगी देण्यात आली आहे. विमान नगर, कोथरूड, बाणेर, औंध, एरंडवणा या परिसरात रस्त्याची कामे सुरू होण्यापूर्वी योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील ५ किलो मीटरचे काम पूर्ण झाले आहे.
नगरसेवकांनी हे आर्थिक वर्ष संपण्याआधी स यादीमधील निधी संपविण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणासोबतच सिमेंटीकरण करण्यात येत आहे. अनेक भागातील रस्ते उखडण्यात आलेले आहेत. रस्ता खोदल्यानंतर तेथे पाणी पुरवठा योजनेची वाहिनी टाकण्याची परवानगी मिळावी यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून पाठपुरावा सुरु आहे. मात्र, पथ विभागाकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे.
=====
सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरु आहेत. तेथे जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी देण्या संदर्भातील प्रस्ताव पथ विभागाला देण्यात आलेले आहेत. पाणी पुरवठा विभागाकडे ३५० किलोमीटर लांबीचे पाईप आलेले आहेत. त्यामध्ये ६, १०, १२, १८ व्यासाच्या पाईप्सचा समावेश आहे. मात्र, पथ विभागाने अद्याप या प्रस्तावावर निर्णय दिलेला नाही. ७ फूट व्यासाच्या मुख्य वाहिनीचेही काम चालू महिन्यात हाती घेण्याचे नियोजन आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग