मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:40+5:302021-07-30T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली. यात लालपरी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली. यात लालपरी, शिवशाही, शिवनेरी, आदी गाड्यांचा समावेश आहे. मात्र, ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन समजली जाणारी एसटी अद्यापही ग्रामीण भागापासून दूर आहे. ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना सकाळी बाहेरगावी जाणे त्रासदायक ठरत आहे. एसटी सेवा बंद असल्याने अनेक प्रवासी टमटम, वडापने प्रवास करीत आहे.
पुणे जिल्ह्यात पूर्वी रोजच्या २०० गाड्या ह्या मुक्कामी असायच्या. मध्यंतरी यातील ७५ गाड्या सुरू केल्या; मात्र त्यापैकी ४० गाड्या पुन्हा बंद झाल्या. आता केवळ ३५ गाड्या सुरू आहे.
एसटीची प्रवासी सेवा सुरू असली तरीही अद्यापही ५० टक्के एसटी गाड्या आगारातच थांबून आहेत. पाऊस, खराब रस्ते व ग्रामीण भागात प्रवाशांचा कमी असणारा प्रतिसाद यामुळे बहुतांश एसटी मुक्कामी जाणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे गावांत एसटी येत नसल्याने वडाप, टमटमचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
बॉक्स १
पुणे विभागात एकूण बसेस : एक हजार
सध्या सुरू असलेले बसेस : ५९०
आगारात उभ्या असलेल्या बसेस : ४८२
बॉक्स २
पूर्वी कोणत्या गावी सुरू होती :
पुणे विभागाच्या १३ आगारांपैकी शिवाजीनगर, भोर, वाकडेवाडी व इंदापूर आदी आगरांच्या बहुतांश गाड्या मुक्कामी जाणे बंद झाले आहे. यात पिराचीवाडी, दहिटणे, कोरेगाव भिवर, पसुरे, पोळे, घोले, घिसरे आदी छोट्या गावांत पूर्वी एसटी गाड्या मुक्कामी जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत.
बॉक्स ३
५० टक्के बसेस आगारातच :
पुणे विभागाच्या १३ आगारांतील वाहतूक सुरू आहे. मात्र, जवळपास ५० टक्के गाड्या आगारातच उभे आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात सोडण्यापेक्षा आगारात थांबून ठेवणे ही एसटीची भूमिका आहे. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या कमी करणे, मुक्कामी गाड्या बंद करणे, आदी कारणांमुळे बसेस या आगारातच उभ्या आहेत.
कोट १
काही मार्गावरच्या गाड्या मुक्कामी जात आहेत. मात्र, काही गाड्या या खराब रस्ते किंवा मार्गावर पाणी येणे आदी कारणांमुळे मुक्कामी गेल्या नाही. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर त्या पुन्हा सुरू करू.
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे