Pune | महिला पोलिसावर अत्याचार केल्याच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:45 AM2023-05-18T11:45:35+5:302023-05-18T11:50:02+5:30
आरोपीने वारंवार वेगवेगळ्या लॉजमध्ये पीडित महिला कॉन्स्टेबलला नेले व अत्याचार केले, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे...
पुणे : महिला पोलिस कॉन्स्टेबलला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणातून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षाराणी पत्रावळे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
संदीप मेमाणे (वय २४, रा. उरळीकांचन, ता. हवेली, जिल्हा-पुणे) असे निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिला कॉन्स्टेबलने फिर्याद दिली होती. महिला कॉन्स्टेबल २०१२ मध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे एस.वाय.बी.ए. ची परीक्षा देण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांची आरोपीशी ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाची मागणी घातली. त्यावेळी फिर्यादीने आरोपीला माझा घटस्फोट झाला आहे, याची पूर्वकल्पना दिली होती. आरोपीने संबंधित महिला कॉन्स्टेबलशी जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वारंवार वेगवेगळ्या लॉजमध्ये पीडित महिला कॉन्स्टेबलला नेले व अत्याचार केले, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीला अनेक वेळा ब्लॅकमेल केले होते. मला १० लाख रुपये दे नाहीतर मी तुला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवेन, मी पोलिस आहे, तुला कसा अडकवायचा हे मला चांगले माहिती आहे, अशा धमक्या दिल्यानंतर मेमाणे याने गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हडपसर पोलिस स्टेशन व पोलिस आयुक्तालयात फिर्यादीविरुद्ध तक्रारी अर्ज केला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा युक्तिवाद ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार व ॲड. अक्षद संजीव वायकर यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.