गलांडवाडीत दीड एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 16:56 IST2023-12-29T16:56:26+5:302023-12-29T16:56:53+5:30
परिसरातील ग्रामस्थांनी आग रोखण्याचा प्रयत्न केला पण आगीच्या झळा खूप मोठ्या होत्या

गलांडवाडीत दीड एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान
केडगाव: गलांडवाडी, ता. दौंड येथील दिपक बबनराव ताकवले यांच्या शेतातील तोडणीला आलेल्या ऊसासआग लागली. शुक्रवार दि २९ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान ही आग लागली. महावितरणची मेन लाईन सदर उसाच्या वरून गेलेली आहे. त्या मेन लाईन नजीक पिंपळाच्या झाडाची फांदीचे घर्षण तारेला होत होते. दुपारच्या वेळी अचानक ठिणग्या पडून सदर ऊस अवघ्या काही मिनिटात जळून खाक झाला.
या उसामध्ये शेतकऱ्यांनी केलेले ड्रीप लाईन व सब लाईन पाईप जळून खाक झाले. शेतकऱ्याचे सुमारे चार लाख ते पाच लाखाच्या दरम्यान एकूण नुकसान झाले. परिसरातील ग्रामस्थांनी आग रोखण्याचा प्रयत्न केला पण आगीच्या झळा खूप मोठ्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या उसाव्यतिरिक्त शेजारी इतर मोठे पीक नव्हते. नाहीतर या पेक्षा देखील खूप मोठे नुकसान झाले असते. घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता पारगाव रोहित तरटे, वायरमन सुभाष शेळके, सहाय्यक नारायण साखरकर यांनी तात्काळ धाव घेतली. महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी ताकवले यांनी मागणी केली आहे.